Maharashtra politics : सोनिया गांधींसमोर रडले की नाही? अशोक चव्हाण राहुल गांधींच्या दाव्यावर स्पष्टच बोलले
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये बोलताना मोठा दावा केला होता, यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नांदेड, मुजीब शेख, प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर झाला. या कार्यक्रमात इंडिया आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी मोठं वक्तव्य केलं. 'महाराष्ट्रातील एक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडत होते. त्यावेळी माझ्या आईसमोर (सोनिया गांधी) रडून सांगत होते मला लाज वाटतेय, माझी या शक्तीविरोधात लोकांविरोधात लढण्याची ताकद नाही. मला तुरुंगात जायचं नाही' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांचे हे विधान माझ्यासंदर्भात असेल तर ते हास्यास्पद आहे. मी कधीही सोनिया गांधी यांना भेटलो नाही. त्यामुळे मी सोनिया गांधी यांना भेटून माझी भावना व्यक्त केली हे वक्तव्य दिशाभूल करणारं असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाचं काम करत होतो. मी पक्ष सोडेपर्यंत कोणालाही माहिती नव्हती, हे वास्तव आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचं विधान माझ्या संदर्भात असेल तर ते चुकीचं आहे. दरम्यान काँग्रेसच नव्हे तर इतर पक्षाचे नेतेही भीतीपोटी भाजपात प्रवेश करत आहेत असाही आरोप करण्यात आला होता. याबाबत चव्हाण यांना विचारले असता, ते म्हणाले की मी इतरांबाबत बोलणार नाही. माझाबद्दल मी सांगतो, भाजपात भविष्य आणि भवितव्य असल्यामुळे मी प्रवेश केला.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
March 18, 2024 12:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Maharashtra politics : सोनिया गांधींसमोर रडले की नाही? अशोक चव्हाण राहुल गांधींच्या दाव्यावर स्पष्टच बोलले