'आमच्याकडे राहिले तर सुरक्षित राहतील', दाजींच्या काँग्रेस प्रवेशावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
माजी खासदार खतगावकर यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये जाण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली आहे.
मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या आधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसलाय. त्यांचे दाजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस प्रवेशाची घोषणा केलीय. नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यानंतर सूर्यकांता पाटील आणि भास्करराव खतगावकर यांनी वेगळ्या वाटा निवडल्यानं भाजपच्या अडचणीत भर पडत आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. अशोक चव्हाण म्हणाले की, “आमच्याकडे राहिले तर ते सुरक्षित राहतील.”
advertisement
माजी खासदार खतगावकर यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये जाण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली आहे. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांना नायगाव मतदार संघातून काँग्रेसकडून तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे खतगावकर यांनी जाहीर केले होते. त्यावर त्यांचे मेहुणे अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. आज पुन्हा याबाबत चव्हाणांना विचारले असता “खतगावकर आमच्याकडे राहिले तर सुरक्षित राहतील मी इतकं सांगू शकतो” असं अशोक चव्हाण म्हणाले.
advertisement
जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले, मात्र मराठा आरक्षणाबाबत बरंच काम झालेलं आहे. समन्वयातून मार्ग सुटलेला आहे. 10 टक्के आरक्षण मिळालं, कुणबी प्रमाणपत्रं मिळाली, नोकऱ्या लागल्या, त्यामुळे उपोषणाचा मार्ग न स्वीकारता समन्वयातून मार्ग सोडवण्यासाठी शासनाची भूमिका आहे. त्यांनी प्रतिसाद द्यावा अशी माझी विनंती असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
advertisement
नांदेडमध्ये भाजपसमोर अडचणी, अनेकांनी सोडली साथ भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे सख्खे दाजी आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का देऊन अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत भास्करराव पाटील खतगावकर, त्यांच्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसच्या अनेकांनी भाजपचे कमळ हाती घेऊन मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला होता. पण नांदेडमधील लोकसभेला झालेली हार आणि जनमताचा कौल लक्षात आल्यावर अनेकजण भाजपची साथ सोडत आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2024 2:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
'आमच्याकडे राहिले तर सुरक्षित राहतील', दाजींच्या काँग्रेस प्रवेशावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया