नांदेडमध्ये पोलिसांसमोरच महिलेला बेदम मारहाण, जमावाने घेरून केला हल्ला, VIDEO व्हायरल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेला जमावाने बेदम मारहाण केली आहे.
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड: नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेला जमावाने बेदम मारहाण केली आहे. विशेष बाब म्हणजे घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थितीत होते. तरीही त्यांनी मध्यस्थी केली नाही. किंवा महिलेला मदत केली नाही. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर विविध प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत.
ही घटना वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमेश कॉलनी परिसरात घडली. 'मुलं चोरणारी' असल्याच्या संशयावरून एका बुरखाधारी महिलेला जमावाने पोलिसांसमोरच मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमेश कॉलनी भागात एक बुरखा घातलेली महिला संशयास्पद रित्या फिरत होती. ती मुले चोरणारी असल्याच्या अफवेमुळे परिसरातील महिला आणि पुरुषांनी तिला घेरले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांच्या समोरच जमावाने त्या महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये मारहाण सुरू असताना पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही, त्यांनी जमावाला रोखण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत.
advertisement
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांसमोरच एका महिलेला मारहाण होऊनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही, यावरून सर्वत्र चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
August 11, 2025 10:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
नांदेडमध्ये पोलिसांसमोरच महिलेला बेदम मारहाण, जमावाने घेरून केला हल्ला, VIDEO व्हायरल