नाशिकच्या लेकीचं धाडस! छेड काढणाऱ्या नराधमाचा व्हिडिओ केला व्हायरल; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Reported by:Laxman Ghatol
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपी हिमांशू झा याच्यावर 'पोक्सो' (POCSO) कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक: नाशिकच्या अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मात्र, पीडित मुलीने न घाबरता सोशल मीडियाचा आधार घेत या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल केला आणि थेट पोलिसांकडे तक्रार केला. या व्हिडिओची गंभीर दखल घेत नाशिक पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी हिमांशू झा याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी हा वकिलीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी गंगापूर रोड परिसरात सकाळी धावण्यासाठी गेली होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या हिमांशू झा याने तिची छेड काढली. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलगी घाबरून न जाता तिने घडलेला सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. नाशिकमध्ये मुली सुरक्षित आहेत का? असा सवाल करत तिने नाशिक पोलिसांकडे मदत मागितीली होती.
advertisement
सोशल मीडियावरील व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटिझन्सनी नाशिक पोलिसांना टॅग करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले. गंगापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मुलीने दिलेल्या वर्णनानुसार आणि दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी हिमांशू झा याला निष्पन्न केले आणि त्याला बेड्या ठोकल्या.
advertisement
आरोपीवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा
अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपी हिमांशू झा याच्यावर 'पोक्सो' (POCSO) कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणानेच अशा प्रकारचे कृत्य केल्याने नाशिकमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे सर्वसामान्य नाशिककरांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 10:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिकच्या लेकीचं धाडस! छेड काढणाऱ्या नराधमाचा व्हिडिओ केला व्हायरल; पोलिसांनी ठोकल्या बेड्या








