नाशिक हादरलं: ट्यूशनमध्ये रचला खूनी खेळ, दहावीच्या विद्यार्थ्याची क्लासमेटकडून निर्घृण हत्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Nashik: नाशिक शहरातील सातपूर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या त्याच्याच क्लासमधील दोघांनी निर्घृण हत्या केली आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिक शहरातील सातपूर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या त्याच्याच क्लासमधील दोघांनी निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत विद्यार्थ्याचा जीव घेतला आहे. हा सगळा प्रकार पीडित विद्यार्थी ट्यूशनसाठी जात असलेल्या क्लासेसच्या आवारात घडला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
यशराज गांगुर्डे असं हत्या झालेल्या १६ वर्षीय मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. खासगी शिकवणी वर्गात (ट्युशन) बेंचवर बसण्यावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस दोन्ही अल्पवयीन आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातपूर भागातील ज्ञानगंगा क्लासेसमध्ये यशराज गांगुर्डे हा दहावीचा विद्यार्थी शिकवणीसाठी जात होता. बुधवारी (१ ऑगस्ट) त्याचा त्याच्याच क्लासमधील दोन अल्पवयीन मित्रांसोबत बेंचवर बसण्यावरून वाद झाला. तेव्हापासून दोन्ही आरोपी यशराजला खुन्नस देत होते. पण शनिवारी पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला.
advertisement
क्लासच्या आवारातच या दोन मुलांनी यशराजला मारहाण करण्यास सुरुवात केली. हातच्या चापटी आणि लाथा-बुक्क्यांनी केलेल्या या मारहाणीत यशराज गंभीर जखमी झाला. हाणामारीच्या घटनेनंतर त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सातपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. खाजगी क्लाससारख्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 03, 2025 7:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिक हादरलं: ट्यूशनमध्ये रचला खूनी खेळ, दहावीच्या विद्यार्थ्याची क्लासमेटकडून निर्घृण हत्या