'58 व्हिडीओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार, त्या पुरावे नष्ट करतील...'; रुपाली पाटलांचे कोणावर खळबळजनक आरोप?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अशोक खरात याने दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पुणे : नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अशोक खरात याने दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून एक पेनड्राईव्ह जप्त केला असून, त्यात तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे. यावरून रुपाली पाटील यांनी सवाल केला आहे की, "हे ५८ व्हिडिओ म्हणजे ५८ महिलांवर झालेले अत्याचार आहेत का?"
advertisement
रुपाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केला की, संबंधित ट्रस्टवर रुपाली चाकणकर या देखील आहेत, त्यामुळेच पोलीस आतापर्यंत कारवाई करत नव्हते का? "चाकणकर या संवैधानिक पदावर राहिल्या तर त्या पुराव्यांशी छेडछाड करू शकतात किंवा पुरावे नष्ट करू शकतात. जोपर्यंत त्या पदावरून पायउतार होत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणाचा नि:पक्षपाती तपास होऊ शकणार नाही," असेही पाटील यांनी म्हटले आहे.
advertisement
रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा रुपाली पाटील यांनी दिला असून, हा विषय त्या सुनेत्रा पवार यांच्याकडेही नेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, न्यायालयाने अशोक खरात याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाला आता तीव्र राजकीय वळण मिळाले असून महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमधील प्रसिद्ध ज्योतिषी कॅप्टन अशोक खरातला मंगळवारी मध्यरात्री गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी खरात हा मागील दोन वर्षांपासून पीडित विवाहित महिलेचं लैंगिक शोषण करत होता. तुझ्या पतीचा मृत्यू होईल, अशी भीती घालून कॅप्टन खरात महिलेवर अत्याचार करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री त्याला कर्मयोगीनगरमधील बंगल्यातून अटक केली.
advertisement
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 12:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
'58 व्हिडीओ म्हणजे 58 महिलांवर अत्याचार, त्या पुरावे नष्ट करतील...'; रुपाली पाटलांचे कोणावर खळबळजनक आरोप?








