Nashik Traffic: रेणुकादेवी यात्रेनिमित्त भगूर मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Nashik Traffic: शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त भगूर येथील रेणुका मातेचा यात्रोत्सव असतो. या काळात गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत.
नाशिक: शारदीय नवरात्रौत्सवात भगूर येथील ग्रामदेवता रेणुकामातेचा मोठा यात्रोत्सव असतो. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. रेस्ट कॅम्प रोडसह केंद्रीय विद्यालय ते जोशी हॉटेलपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी 10 दिवस दुपारी एक ते रात्री बारा वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.
या दहा दिवसांसाठी पर्यायी मार्ग असा
भगूर रस्त्याने देवळाली कॅम्पकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक रेस्ट कॅम्प रोडवरील जोशी रुग्णालयाकडून स्नेहनगर- पेरूमल मार्ग-खंडोबा टेकडी रस्त्याने जोझिला मार्ग येथून सेंट्रल कॅम्प स्कूलमार्गे पुढे जातील.
देवळाली कॅम्पकडून पुढे भगूरकडे जाणारी वाहतूक भगूर नाका क्र. 2 येथून डावीकडे वळण घेत मल्हारी बाबानगरमार्गे बार्न्स स्कूल रोडवरून शिंगवे बहुला-धोंडीरोड, खंडोबा टेकडी, डेअरी फार्म, आनंदरोडने संसरी नाक्याकडे रवाना होतील.
advertisement
भगूरकडे जाणारी जड-अवजड वाहने ही संसरी नाका येथून उजवीकडे वळण घेत आनंदरोडवरून पुढे शिंगवे बहुलामार्गे बार्न्स स्कूलरोडने भगूर नाका क्र.2 कडे रवाना होतील.
या दहा दिवसात कुठल्याही नागरिकांची आणि देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरता पोलीस दलाने या पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे जनतेला आवाहन केले आहे.
advertisement
सैन्याच्या वाहनांना निर्बंध लागू नाही.
या अधिसूचनेनुसार सैन्यदलाच्या सेवेतील कुठल्याही वाहनांना वरील निर्बंध लागू राहणार नाही. या दहा दिवसांच्या कालावधीत सैन्यदलाची वाहने त्यांच्या नेहमीच्या वापरातील रस्त्यांवरून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करत ये-जा करतील. तसेच पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब, शववाहिका तसेच स्थानिक निवासी नागरिकांच्या वाहनांना निर्बंध लागू राहणार नाही, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 23, 2025 10:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Traffic: रेणुकादेवी यात्रेनिमित्त भगूर मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?