दरवाजा तोडला अन्...! कीर्तनकाराच्या घरात घुसून राडा, निवृत्ती महाराज वाडेकरांच्या कुटुंबाला मारहाण
- Published by:Prachi Amale
Last Updated:
जमावाने घरात शिरताच निवृत्ती महाराज वाडेकर यांना अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगरतच्या गांधेली गावामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कीर्तनादरम्यान केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे संतप्त जमावाने कीर्तनकाराच्या घरात घुसून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण केली. या भीषण हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गांधेली येथील रहिवासी असलेले प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांनी एका कीर्तनादरम्यान काही वादग्रस्त विधाने केली होती. या विधानामुळे गावातील काही लोक नाराज झाले होते. मात्र, या नाराजीचे रूपांतर थेट हिंसेत होईल, याची पुसटशी कल्पनाही कुणाला नव्हती. एका मोठ्या जमावाने एकत्र येत थेट वाडेकर यांच्या घरावर हल्ला केला. घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
advertisement
घरात घुसून केली माराहण
जमावाने घरात शिरताच निवृत्ती महाराज वाडेकर यांना अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा घरात त्यांची पत्नी, त्यांची लहान मुलगी आणि वृद्ध आई-वडील उपस्थित होते. मारहाणीच्या या गोंधळात जमावाने घरातील महिला आणि वृद्धांनाही धक्काबुक्की केली. आपल्या डोळ्यादेखत वडिलांना मारहाण होताना पाहून चिमुरडीसह संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे.
advertisement
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद
ही सर्व घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. जमाव कशा प्रकारे कायदा हातात घेऊन घरात शिरला आणि त्यांनी तिथे कशी दहशत निर्माण केली, हे या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
कठोर कारवाई करण्याची मागणी
वैचारिक वादातून एखाद्याच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला करण्याच्या या प्रवृत्तीचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. कीर्तनकार आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, दोषींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 6:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दरवाजा तोडला अन्...! कीर्तनकाराच्या घरात घुसून राडा, निवृत्ती महाराज वाडेकरांच्या कुटुंबाला मारहाण







