मनोज जरांगे लढत असताना तुम्ही काय करताय? पाठिंबा का नाही? ओमराजेंच्या कार्यालयाबाहेर मराठा आंदोलक आक्रमक
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Om RajeNimbalkar: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे असे समर्थनाचे पत्र तुम्ही द्या, अशी मागणी करत सकल मराठा आंदोलकांनी ओमराजे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
धाराशिव : जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत असताना तुम्ही आंदोलनाला पाठिंबा का देत नाही किंबहुना आरक्षणाच्या समर्थनार्थ जाहीर भूमिका घेऊन आपले मत का मांडत नाही? असा सवाल करुन धाराशिवमधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या कार्यालयाबाहेर अर्धनग्न होत आंदोलन सुरू केले आहे.
ओमराजे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी अर्धनग्न होत बोंबा मारो आंदोलन केले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे असे समर्थनाचे पत्र तुम्ही द्या, अशी मागणी करत सकल मराठा आंदोलकांनी ओमराजे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
आंदोलकांच्या भूमिकेने ओमराजे संकटात
अंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे आंदोलन करीत आहे. त्यांची प्रकृती आंदोलन करण्यासाठी साथ देत नसताना लोकप्रतिनिधी आरक्षणाच्या समर्थनार्थ भूमिका का घेत नाही? असे सवाल करून आंदोलकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केले.
advertisement
जोपर्यंत भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लवकरात लवकर आरक्षणप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करून मनोज जरांगे यांच्या भेटीला जागे तसेच सहयोगी खासदारांना देखील यासंबंधी अवगत करावे. राज्यातील मराठा समाजाच्या अस्तित्वाचा लढा सुरू असताना राज्यव्यापी आंदोलनाकडे दुर्लक्ष करू नये, अशा मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या. तसेच जोपर्यंत ओमराजेंच्या भूमिकेचे पत्र मिळत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
advertisement
ओमराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान, आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्याने खासदार ओमराजे निंबाळकर काहीसे संकटात सापडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एका समाजाच्या समर्थनार्थ भूमिका घेऊन दुसऱ्या समाजाची नाराजी ओढावून घेणे शिवसेना पक्षाला परवडणारे नाही, हे ओमराजे यांना पक्के माहिती असल्याने ते काय भूमिका घेतात आणि यातून कसा मार्ग काढतात? याकडे सर्वांचं लक्ष असेल.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
September 23, 2024 3:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/उस्मानाबाद/
मनोज जरांगे लढत असताना तुम्ही काय करताय? पाठिंबा का नाही? ओमराजेंच्या कार्यालयाबाहेर मराठा आंदोलक आक्रमक