वनक्षेत्र पेटवून देऊ अन् तक्रारदारालाच गुंतवू, पंढरपुरात दोन वन अधिकाऱ्यांचे ऑडिओ व्हायरल; मोठी खळबळ
- Reported by:Virendrasigh Utpat
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आपणच वनपरिक्षेत्र पेटवून तक्रारदारालाच गोत्यात आणू, अशा आशयाचे संवाद या ऑडिओमध्ये असल्याचा आरोप आहे.
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील खरातवाडी येथील राखीव वनक्षेत्राच्या प्रकरणात धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. दोन वनाधिकाऱ्यांमधील कथित ऑडिओ कॉल रेकॉर्ड सध्या पंढरपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तक्रारदारालाच अडकवण्यासाठी थेट वनक्षेत्र पेटवण्याचा कट रचल्याचा आरोप होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
खरातवाडी येथील राखीव वनक्षेत्रात झालेल्या कथित गैरप्रकारांविरोधात दादासाहेब चव्हाण यांनी वन विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतरच संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये दोन वनाधिकारी आपसात संभाषण करताना तक्रारदार दादासाहेब चव्हाण यांनाच अडकवण्याची योजना आखत असल्याचे ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. आपणच वनपरिक्षेत्र पेटवून तक्रारदारालाच गोत्यात आणू, अशा आशयाचे संवाद या ऑडिओमध्ये असल्याचा आरोप आहे.
advertisement
वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
या कथित ऑडिओमुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वनसंरक्षणासाठी जबाबदार असलेले अधिकारीच जर तक्रारदारांविरोधात कट रचत असतील, तर सामान्य नागरिकांनी तक्रार करायची तरी कशी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे हा कॉल रेकॉर्ड खरा असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात असला, तरी अद्याप अधिकृत स्तरावर त्याची सत्यता तपासली जात आहे.
advertisement
पंढरपूर तालुक्यात वन विभागाविषयी तीव्र नाराजी
दरम्यान, या प्रकरणातील तक्रारदार दादासाहेब चव्हाण यांनी या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी थेट राज्याचे वनमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे आवाहन केले आहे. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात वन विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत असून, येत्या काळात या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 5:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वनक्षेत्र पेटवून देऊ अन् तक्रारदारालाच गुंतवू, पंढरपुरात दोन वन अधिकाऱ्यांचे ऑडिओ व्हायरल; मोठी खळबळ










