मृत्यूला जवळून पाहिलं...उसतोड करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला, कसा वाचवला जीव? महिलेनं सांगितला थरार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे रोहन बोंबेसह तीन जणांचा मृत्यू, ऊसतोड मजुरांमध्ये भीती व सुरक्षा मागणी, वनविभागाकडून तातडीच्या उपायांची आवश्यकता.
पिंपरखेड, प्रतिनिधी सचिन तोडकर: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, १३ वर्षीय रोहन बोंबे या मुलाच्या हल्ल्याची ताजी घटना असतानाच आज पुन्हा याच परिसरात एका महिला ऊसतोड मजुरावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सोबतच्या मजुरांनी तात्काळ आरडाओरड करत धाव घेतल्याने, ही महिला मजुराच्या तावडीतून थोडक्यात बचावली आहे.
पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या दहशतीत ऊसतोड कामगार
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, जांबूत आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच १३ वर्षीय रोहन बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तसेच, यापूर्वीही शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव यांचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड तणाव आणि भीतीचे वातावरण आहे. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक भयभीत झाले असले तरी, शेतीत काम करणे आणि ऊसतोडणी थांबवणे शक्य नाही.
advertisement
बिबट्याने केला ऊसतोड मजुरावर हल्ला करण्याचा प्रयत्न
आज पिंपरखेड परिसरात ऊसतोडणीचे काम सुरू असताना बिबट्याने एका महिला ऊसतोड मजुरावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. महिला मजूर ऊस तोडण्याच्या कामात व्यस्त असताना, बाजूच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्या दिशेने झेप घेतली. महिला मजुराने आरडाओरड केल्याने आणि शेजारी काम करत असलेले इतर मजूर त्वरित तिच्या मदतीला धावून आल्याने, बिबट्या गोंधळून गेला आणि त्याला आपला हल्ला अर्धवट सोडून उसाच्या शेतात पळ काढावा लागला. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मजुरांमध्ये घबराट पसरली आहे.
advertisement
मजुरांकडून संरक्षणाची मागणी
या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर ऊसतोड मजुरांनी आणि त्यांच्या मुकादमांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आधीच बिबट्यांच्या हल्ल्यात तीन जणांचा जीव गेल्याने तणाव असताना, आता ऊसतोड करतानाही जीव धोक्यात घालावा लागत आहे. वनविभागाने या परिसरात ऊसतोडणीचे काम पूर्ण होईपर्यंत तातडीने सुरक्षा पुरवावी. ऊसतोडणीच्या ठिकाणी गस्ती पथक किंवा किमान सायरन वाजवणारे पथक नेमले जावे, जेणेकरून बिबट्या जवळ आल्याची सूचना मिळून मजूर सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतील अशी मागणी केली आहे.
advertisement
हल्लाचा प्रयत्न झालेल्या महिलेनं सांगितला थरार
view commentsआम्ही उस तोडत होतो आणि कडेला मुळ्या बांधताना आमच्यावर हल्ला केला. आमचे मुकादम आले सगळ्या लोकांनी आरडाओरडा केला तेव्हा तो उसात पळाला. तो लगेच पळाला म्हणून जीव वाचला नाहीतर काही खरं नव्हतं अशी प्रतिक्रिया उसतोड महिलेनं दिली आहे. हल्ला झाला, बायांच्या मागे होता. ५-६ फुटांचं अंतर होतं, आम्ही सगळी इकडून पळत गेलो, आरडाओरडा केला त्यामुळे तो पळून गेला. बिबट्याची भीती आहे. तसंच काम करावं लागतं. आम्हाला बिबट्याची अडचण येत असते. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त केला. यावर्षी बिबट्याने धुमाकूळ चालू केला आहे. आज सकाळीच दिसला. समोरच दिसला त्यामुळे आम्हाला काळजी घ्यावी लागते. पोटासाठी काम थांबवू शकत नाही, उसतोड करावी लागते नाहीतर पोट कसं भरणार.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 05, 2025 12:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मृत्यूला जवळून पाहिलं...उसतोड करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला, कसा वाचवला जीव? महिलेनं सांगितला थरार


