Pune : भाजपने उमेदवारी दिली पण ट्रोलर्समुळे अर्ज मागे घ्यावा लागला, पूजा मोरे नवऱ्याच्या गळ्यात पडून रडल्या
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pooja More Jadhav withdraw Election Application: गरिबीतून संघर्ष करून मी इथवर पोहोचले पण माझ्या नशिबात त्याग होता, असे सांगताना पती धनंजय जाधव यांच्या गळ्यात पडून पूजा मोरे रडल्या.
पुणे : पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक दोन मधून भारतीय जनता पक्षाने पूजा मोरे यांना उमेदवारी दिली होती. परंतु भाजप कार्यकर्ते आणि संघ समर्थकांनी पूजा मोरे यांच्या मागील काही वर्षांतल्या विधानांचा संदर्भ देऊन उमेदवारीच्या निर्णयावर प्रचंड टीका केल्याने अखेर त्यांना अर्ज माघारी घ्यावा लागला. अर्ज माघारी घेतल्यानंतर त्यांना भावना अनावर झाल्या. गरिबीतून संघर्ष करून मी इथवर पोहोचले पण माझ्या नशिबात त्याग होता, असे सांगताना पती धनंजय जाधव यांच्या गळ्यात पडून पूजा मोरे रडल्या. तसेच हिंदुत्वाची विचारधारा मी समजून घेतली आहे, मला भाजपने आणि संघ कार्यकर्त्यांनी स्वीकारावे, असेही पूजा मोरे म्हणाल्या.
पुण्यातील प्रभाग क्रमांक दोन मधून पूजा मोरे जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. प्रभाग क्रमांक एक मधून त्यांना उमेदवारी हवी होती. मात्र पक्षाने नाकारून दोनमधून त्यांना एबी फॉर्म दिला. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर समाज माध्यमांवर भाजप कार्यकर्ते आणि संघ समर्थकांनी पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी कशी मिळू शकते? असा सवाल करीत भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाला विचारला. तसेच पहलगाम हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या नाहीत, असे विधान पूजा मोरे यांनी केले होते. या विधानाची आठवण करून देत पूजा मोरे हिंदुत्ववादी नसल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले. एकंदर पूजा मोरे यांच्या उमेदवारीला होणारा विरोध लक्षात घेता पक्षाने त्यांना अर्ज माघारी घ्यायला सांगितले.
advertisement
माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्याशा चुकीचा खूप मोठा बाऊ केला
पूजा मोरे जाधव म्हणाल्या, सध्या मला प्रचंड वेदना होतायेत. मी बोलू शकत नाही. माझा प्रवास खूप संघर्षातून-छोट्या घरातून झालाय. धनंजय यांच्याशी लग्न करून मी पुण्यात येईन, असेही मला कधी वाटले नाही. पोलिसांच्या लाठ्या काठ्या खात शेतकऱ्यांसाठी पाच गुन्हे अंगावर घेतले. वकिलांना द्यायला अनेक वेळा माझ्याकडे पैसे नसायचे. अशा परिस्थितीत मी काम करून इथपर्यंत आले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाचे तिकीट मिळाले, अनेक कार्यकर्त्यांना तिकीटे मिळत नाही, ते भाग्य माझ्या नशिबी आले होते. तळागाळातल्या अनेकांसाठी काम करण्याची माझी इच्छा होती. माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्याशा चुकीचा खूप मोठा बाऊ करून जे षडयंत्र माझ्या विरोधात रचले, ते पाहून वाईट वाटते.
advertisement
भाजपची विचारधारा मी समजून घेतलीये, मला हिंदुत्वासाठी काम करायचे आहे
गरीब कुटुंबातून आल्यामुळे मला प्रचंड वेदना होतायेत, ज्या कुणी समजून घेत नाही. पण मी लढणारी मुलगी आहे. माझा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. पक्षाची विचारधारा मी समजून घेतली आहे. मला हिंदुत्वासाठी काम करायचे आहे. आतापर्यंत कारखानदारांविरोधात शेतकऱ्याच्या बाजूने मी लढले. हिंदुत्ववादी चळवळ मला शहरात आल्यानंतर कळाली. आता मी हिंदुत्वासाठी काम करेन.
advertisement
तुम्हाला जेवढे हिंदुत्व प्रिय, तेवढेच मलाही
मला हिंदुत्वासाठी काम करायचे असल्याने मी त्याग करायला तयार आहे. मी हिंदू आहे, तुम्हाला जेवढे हिंदुत्व प्रिय आहे, तेवढे मलाही प्रिय आहे. संघ परिवार, हिंदुत्ववादी संघटनेने मला स्वीकारावे, अशी हात जोडून विनंती पूजा मोरे जाधव यांनी केली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 3:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune : भाजपने उमेदवारी दिली पण ट्रोलर्समुळे अर्ज मागे घ्यावा लागला, पूजा मोरे नवऱ्याच्या गळ्यात पडून रडल्या










