Pune Solapur Road Accident: ओव्हरटेकचा नाद नडला! ४४ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ST बसला भीषण अपघात
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला एका सुसाट कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, एसटी बस महामार्गाच्या कडेला जाऊन उलटली.
सुमित सावंत, प्रतिनिधी पाटस, दौंड: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला एका सुसाट कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, एसटी बस महामार्गाच्या कडेला जाऊन थेट उलटली. मात्र, या भीषण अपघातात नियतीने साथ दिली आणि बसमधील ४४ प्रवासी मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडले.
ओव्हरटेकिंगचा थरार, एसटीचा चक्काचूर
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-पुणे ही एसटी बस आपल्या मार्गाने जात असताना एका भरधाव कंटेनरने चालकाच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कंटेनरची एसटीला इतकी जोरात धडक बसली की एसटी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. महामार्गावर सध्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. बसच्या पुढच्या आणि मागच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
स्थानिकांची देवदूतासारखी धाव
अपघात होताच प्रवासी किंचाळले घाबरले. बस पलटी झाल्याचे पाहताच जवळच असलेल्या हॉटेलमधील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बसच्या खिडक्यांमधून आणि दरवाजातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. केवळ २ ते ३ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ४४ जणांचा जीव अगदी थोडक्यात वाचला.
advertisement
पुणे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत, ज्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. अशातच अवजड वाहनांची ओव्हरटेक करण्याची घाई प्रवाशांच्या जिवावर बेतत आहे. पाटस परिसरात झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कंटेनर चालकावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
Location :
Solapur [Sholapur],Solapur,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 12:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Solapur Road Accident: ओव्हरटेकचा नाद नडला! ४४ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ST बसला भीषण अपघात









