'...तर पुण्यात निवडणूक लढणार नाही', मनसे कार्यकर्त्यांसमोर राज ठाकरेंचं मोठं विधान
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्यातील मनसेच्या बैठकीतून मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातून निवडणूक न लढण्याचा गर्भित इशारा कार्यकर्त्यांना दिला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बैठका आणि सभांचा धडाका सुरू केला आहे. राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच मनसे राज्यभर सक्रीय झाली. विधानसभा निवडणुकीत मनसेला म्हणावं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी मनसेनं कंबर कसली आहे. स्वत: राज ठाकरे मुंबई, ठाणे आणि पुण्यात बैठका घेत आहेत.
नुकतीच मनसेची पुण्यात देखील बैठक पार पडली. या बैठकीतून आता मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातून निवडणूक न लढण्याचा गर्भित इशारा कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
राज ठाकरे पुण्यात काय म्हणाले?
दिलेले कार्य अपूर्ण ठेवणे, पक्ष संघटनेची बांधणी करण्यास हातभार न लावणे, मतदार याद्यांचे काम न करणे या सारख्या विविध विषयांवर काम होत नसेल तर पुण्यात निवडणूक लढवणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. फक्त पदं घेऊन तुम्ही तुमच्या तुंबड्या भरणार असाल, तर वेगळा मार्ग निवडा, अशा शब्दांत राज ठाकरेंनी बैठकीत पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे.
advertisement
जे पदाधिकारी दिलेले कार्य पूर्ण करत नसतील, तर त्यांनी सोडून द्यावं अशा सूचना देखील या बैठकीतून राज ठाकरे यांनी केल्या. काही शाखा अध्यक्षांच्या कामाच्या पद्धतीवरून राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खरं तर, लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकला चलोची भूमिका घेतली. आता ठाकरे गटासोबत त्यांची जवळीक वाढली आहे. मात्र मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्यामुळे अद्याप मनसेचा मविआमध्ये अधिकृत प्रवेश झाला नाही. अशात पक्षांतर्गत कार्यकर्त्यांना आलेली मरगळ यामुळे राज ठाकरेंना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 07, 2025 9:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'...तर पुण्यात निवडणूक लढणार नाही', मनसे कार्यकर्त्यांसमोर राज ठाकरेंचं मोठं विधान


