Navratri 2025: 70 फूट उंची अन् 9 टन वजन! पुण्यातील मीनाक्षी मंदिराचा देखावा ठरतोय भक्तांसाठी आकर्षण
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Navratri 2025: पुण्यातील सहकारनगर भागात श्री लक्ष्मी मातेचं सुंदर मंदिर आहे.
पुणे: नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध मंडळं आणि मंदिरांनी सजावट व आकर्षक देखावे साकारले आहेत. पुण्यातील लक्ष्मी माता मंदिर परिसरात यंदा भव्य मीनाक्षी मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. दक्षिण भारतातील प्रसिद्ध मदुराई येथील मीनाक्षी मंदिरापासून प्रेरणा घेऊन तयार केलेली ही कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. हेमंत बागुल यांनी लोकल 18शी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली.
पुण्यातील सहकारनगर भागात श्री लक्ष्मी मातेचं सुंदर मंदिर आहे. आबा बागुल यांनी 34 वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मागील 31 वर्षांपासून याठिकाणी शारदीय नवरात्रौत्सवानिमित विविध देखाव्यांचं आयोजन केलं जातं. सोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि परंपरागत कार्यक्रमांचं देखील उत्साहात आयोजन केलं जातं. यावर्षी मदुराई येथील मीनाक्षी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
advertisement
70 फूट उंचीचा कळस या देखाव्याचं मुख्य आकर्षण आहे. रंगीबेरंगी सजावट, सूक्ष्म नक्षीकाम आणि विद्युत रोषणाईमुळे हा देखावा अधिकच देखणा आणि आकर्षक दिसत आहे. मंदिराचा गाभारा, शिखर आणि परिसरातील सजावट दक्षिण भारतीय शिल्पकलेची झलक दाखवत आहे. कलाकार अमन विधाते आणि त्यांचा कारागिरांनी सुमारे महिनाभर मेहनत घेऊन हा देखावा साकारला आहे. विविध प्रकारच्या लाकडी बांधकामावर प्लॅस्टर, रंगकाम आणि प्रकाशयोजनेच्या सहाय्याने मंदिराचा वास्तवदर्शी लूक आणण्यात आला आहे. पाहणाऱ्यांना जणू काही प्रत्यक्ष मदुराईतील मीनाक्षी मंदिरात आल्याचा भास होतो.
advertisement
70 फूट उंच कळस ठरतोय आकर्षण
मदुराई येथील मीनाक्षी मंदिराप्रमाणेच याठिकाणी देखील तब्बल 70 फूट उंच असा कळस साकारण्यात आला आहे. या कळसाचं वजन 9 टन असून त्यावर सुंदर कोरीव नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात हा देखावा दररोज दर्शनासाठी खुला असून, धार्मिक वातावरणात भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळत आहे. नागरिकांनी कुटुंबासह भेट देऊन हा अनोखा देखावा बघावा, असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 28, 2025 4:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: 70 फूट उंची अन् 9 टन वजन! पुण्यातील मीनाक्षी मंदिराचा देखावा ठरतोय भक्तांसाठी आकर्षण