'मिस्टर प्रफुल्ल पटेल तुम्ही स्वार्थी आहात की...', रोहित पवारांचं थेट चँलेंज, नव्या वादाला फुटलं तोंड
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी पोस्ट करत प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे.
२८ जानेवारी रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघातात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. प्रथमदर्शीनी हा अपघात वाटणाऱ्या या घटनेत आता अनेक कंगोरे समोर आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अजित पवाराच्या विमान अपघातावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. हा अपघात नसून घातपात असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबतचे अनेक पुरावे देखील रोहित पवारांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणले आहेत.
काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातामागे मोठा कट असल्याचा आरोप केला होता. शिवाय घटनेच्या दिवशी अजित पवार रस्त्याने मुंबईहून बारामतीला जाणार होते. मात्र अचानक त्यांचा प्लॅन बदलला. पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलवर सही करायची होती, यासाठी अजित पवारांना मुंबईत थांबवण्यात आलं. परिणामी उशीर झाल्याने त्यांना विमानाने प्रवास करावा लागला, असं रोहित पवार म्हणाले होते. इथं रोहित पवारांनी उल्लेख केलेला पूर्व विदर्भातला नेता म्हणजे त्यांचा रोख थेट प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होता, असं बोललं गेलं.
advertisement
आता थेट रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख करत पत्रकार परिषद घेण्याचं चॅलेंज दिलं आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे माजी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री असाही उल्लेख केला आहे. यातून त्यांचं कनेक्शन व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंह यांच्यासोबत असल्याचं सुचवण्याचा प्रयत्न रोहित पवारांकडून केला जातोय का? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
advertisement
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, "Mr. प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते? हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा."
advertisement
Mr. प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 7, 2026
advertisement
रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये प्रफुल्ल पटेल यांना टॅग केलं आहे. तसेच जस्टीस फॉर अजितदादा असा हॅशटॅग देखील वापरला आहे. रोहित पवारांच्या या पोस्टनंतर आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या सगळ्यावर आता प्रफुल्ल पटेल काय भूमिका घेतात? ते खरंच पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 08, 2026 7:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मिस्टर प्रफुल्ल पटेल तुम्ही स्वार्थी आहात की...', रोहित पवारांचं थेट चँलेंज, नव्या वादाला फुटलं तोंड







