Sai Baba Silver Coin: साईबाबांची चांदीची नाणी नेमकी कुणाकडे? लक्ष्मीबाईच्या वंशजांमध्ये का पेटला वाद?
- Published by:Sachin S
- Reported by:Harish Dimote
Last Updated:
साल 1918, दिवस- विजयादशमीचा..शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या अखेरच्या क्षणी त्यांची निस्सीम भक्त लक्ष्मीबाईंना 9 चांदीची नाणी दिली.
शिर्डी: जगभरातील कोट्यवधी भक्तांचं श्रद्धा स्थान असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांनी लक्ष्मीबाईंना दिलेल्या नाण्यांवरून वाद सुरू झाला आहे. शिर्डीच्या साईबाबांना त्यांच्या अखेरच्या काळात जेवू घालणाऱ्या लक्ष्मीबाई शिंदे यांना बाबांनी 9 चांदीची नाणी भेट म्हणून दिली होती. या नाण्यांवरून लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांमध्ये मालकी हक्कावरून दावे आणि प्रतिदावे सुरू झाले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या चौकशी अहवालामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय.
साल 1918, दिवस- विजयादशमीचा..शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या अखेरच्या क्षणी त्यांची निस्सीम भक्त लक्ष्मीबाईंना 9 चांदीची नाणी दिली. बाबांच्या अखेरपर्यंत त्यांना मायेनं खाऊ पिऊ घालणाऱ्या, त्यांची सेवा करणाऱ्या लक्ष्मीबाईंसाठी हा अमूल्य ठेवा होता. त्यांनी ती नाणी जपून ठेवली. मात्र आज 107 वर्षांनंतर ही नाणी पुन्हा चर्चेत आली आहे. लक्ष्मीबाई शिंदे यांचे वंशज चंद्रकांत शिंदे आणि त्यांचे नातेवाईक ही नाणी आमच्याकडे असल्याचा दावा करतायत तर लक्ष्मीबाई शिंदे यांची नात शैलेजा गायकवाड आणि त्यांचे कुटुंबीय ही 9 नाणी आमच्याकडे असल्याचा दावा करत आहेत.
advertisement
नेमका वाद तरी काय?
साईबाबांनी दिलेल्या 9 नाण्यांची 18 नाणी झाल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर 2022 साली संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी साईबाबा संस्थान आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. त्यात अरुण गायकवाड हे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि 9 नाणी भाविकांना दाखवून मोठ्या देणग्या जमा करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात देणगीचा तपशील आणि विनियोग देण्यात आला असून आमच्या ट्रस्टकडं असलेली नाणीच खरी असल्याचा निर्णय त्यांनी दिल्याचं अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं.
advertisement
लक्ष्मीबाई शिंदेंचे आम्ही वंशज आहोत, त्यामुळे वारसाहक्कानं ती चांदीची नाणी आमच्याकडे असून ती लक्ष्मीबाईंच्या नात शैलेजा गायकवाड यांच्याकडे कशी येतील? असा सवाल त्यांच्या वंशजांनी केला आहे. धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी घेताना आम्हाला हजर राहण्याची सुचना किंवा समन्स दिलेले नाहीत, त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालाविरोधात दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
नाणी शिंदे वाड्यात
लक्ष्मीबाई शिंदे द्वारकामाईजवळील शिंदे वाड्यात राहत होत्या. आपल्या अंतिम काळापर्यंत त्या तिथेच राहिल्या. त्यामुळे वंश परंपरेनुसार साईबाबांनी दिलेली नऊ चांदीची नाणीही याच वाड्यात असल्याचा दुसरा दावा या वाड्यात आजही राहणाऱ्या त्यांच्या वंशजांनी केला. आजपर्यंत ही नाणी याच वाड्यात असून, ती आम्ही कधीही वाड्याच्या बाहेर नेऊन त्याचं प्रदर्शन केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.
advertisement
साईबाबांनी आशीर्वाद रुपात दिलेल्या या नाण्यांबाबत जगभरातील भाविकांमध्ये आस्था आहे. या नाण्यांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी वाढतेय. शिर्डीत येणारे काही भक्त हे गायकवाड यांच्याकडील, तर काही भक्त हे शिंदे यांच्या वाड्यातील नाण्यांचं दर्शन घेतात. ही नाणी घेवून गायकवाड हे भारतभर दर्शन सोहळा आयोजित करतात, तर शिंदेंची नाणी एकाच ठिकाणी ठेवलेली आहेत. या व्यतिरिक्तही आणखी चार नाणी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या या 9 नाण्यांची सत्यता लवकरात लवकर समोर येणं गरजेचं आहे.
view commentsLocation :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
July 30, 2025 11:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sai Baba Silver Coin: साईबाबांची चांदीची नाणी नेमकी कुणाकडे? लक्ष्मीबाईच्या वंशजांमध्ये का पेटला वाद?


