मुंबईत पराभव होताच ठाकरेंना कोकणात मोठा धक्का, निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईत पराभव होताच ठाकरेंना कोकणात देखील मोठा धक्का बसला आहे. एका निष्ठावंत नेत्यानं उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.
मुंबईसह कोकण हा शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. पण शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन्ही ठिकाणी ठाकरे गट बॅकफुटला गेला आहे. यंदा मुंबई महानगर पालिकेत ठाकरे बंधू काहीतरी करिष्मा दाखवतील, असं वाटलं होतं. मात्र ठाकरेंना अपेक्षित यश मिळवता आलं नाही. मुंबईत ठाकरेंचा पराभव झाला आहे. मुंबईत पराभव होताच ठाकरेंना कोकणात देखील मोठा धक्का बसला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गळती लागली आहे. चिपळूणमधील अत्यंत निष्ठावान आणि पक्षाचे जुने आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या टाकळे कुटुंबाने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाचे माजी उपशहरप्रमुख आणि चिपळूण अर्बन बँकेचे संचालक समीर टाकळे यांनी अखेरचा 'जय महाराष्ट्र' करत पक्षाशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत.
चिपळूण शहर आणि तालुक्यात शिवसेना उभी करण्यात टाकळे कुटुंबाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख बंधू टाकळे हे देखील याच कुटुंबातील होते. ज्या काळात शिवसेना ग्रामीण भागात रुजत होती, त्या काळात या कुटुंबाने पक्षासाठी मोठे योगदान दिले. समीर टाकळे यांनीही अनेक वर्षे पक्षाची धुरा सांभाळली आणि एक प्रभावी नेते म्हणून आपली ओळख निर्माण केली. मात्र, आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा 'सेटबॅक' मानला जात आहे.
advertisement
समीर टाकळे यांच्यासोबतच त्यांची कन्या आणि युवती शहर संघटक डॉ. सानिका टाकळे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एकाच कुटुंबातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने चिपळूणमध्ये ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. "यापुढे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाशी आपला कोणताही संबंध राहणार नाही," असे समीर टाकळे यांनी स्पष्ट केले आहे. चिपळूण अर्बन बँकेचे संचालक म्हणून त्यांचा शहरात मोठा जनसंपर्क आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 10:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईत पराभव होताच ठाकरेंना कोकणात मोठा धक्का, निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ










