Dhangar Reservation : 'धनगर समाज रस्त्यावर उतरल्यास सरकार जबाबदार; आमदार गोपीचंद पडळकरांचा इशारा, तारखही सांगितली
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Dhangar Reservation : आरक्षणाचे दाखले द्या, अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरल्यास सरकार जबाबदार राहिल असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी स्वतःच्या सरकारला दिला आहे.
सांगली, 22 ऑक्टोबर (आसिफ मुरसल, प्रतिनिधी) : सध्या राज्यात आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे भाजप आमदार गोपिचंद पडळकर धनगर आरक्षणासाठी राज्याचा दौरा करत आहेत. पडळकर यांचा आज सांगलीत मेळावा झाला. यावेळी त्यांनी थेट स्वतःच्याच सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारने आता न्यायालयाची वाट न बघता धनगर समाजाला एसटीचे दाखले द्यावेत, अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरल्यास सरकार जबाबदार राहील, अश्या शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्याच सरकारला इशारा दिला आहे. सांगलीच्या आरेवाडी येथे आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
60 दिवसात धनगर आरक्षण अंमलबजावणीचे आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. मात्र, आता 31 दिवस झाले, पण एकही पाऊल उचलण्यात आलं नाही, त्यामुळे आता 29 दिवसानंतर धनगर समाज हा रस्त्यावर उतरेल. 21 नोव्हेंबर रोजी राज्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येतील, त्याचबरोबर 11 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथील विधानभवनाला घेरावा घालण्याचा इशारा देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी दसरा मेळाव्यातून दिला आहे. त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी समस्त धनगर समाजाने देखील तीव्र आंदोलनाची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केलं आहे.
advertisement
तसेच या दसरा मेळाव्यातून आमदार पडळकरांनी शरद पवार आणि पवार कुटुंबावर देखील सडकून टीका केली आहे. शरद पवारांचे नाव न घेता, बहूजनाचा बुरखा पांघरेला लांडगा, अशा शब्दात पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच आता 5G चा जमाना आहे. त्यामुळे समस्त बहुजन समाजाने एसटीडीच्या गुलामीतून बाहेर पडावं आणि हे एसटीडी म्हणजे साहेब, ताई, दादा असल्याचं स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आमदार पडळकर यांनी या दसरा मेळाव्याच्या स्टेजवरून धनगर समाजाच्या उन्नतीसाठी हिंदुस्तान शिव मल्हार क्रांती सेने या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली आहे. अराजकीय अशी ही संघटना असणार असल्याचे पडळकरांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
October 22, 2023 9:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Dhangar Reservation : 'धनगर समाज रस्त्यावर उतरल्यास सरकार जबाबदार; आमदार गोपीचंद पडळकरांचा इशारा, तारखही सांगितली