Independence Day 2025: पहिल्या दिवशी..., 92 वर्षांच्या आजींनी गायला स्वातंत्र्य लढ्याचा पाळणा, पाहा संपूर्ण Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Independence Day 2025: देशभक्तीची भावना खोलवर रुजलेल्या सरस्वती आजींचं आजचं वय 92 वर्षे आहे. मात्र आजही त्यांना देश स्वातंत्र्याची भावना प्रेरित करणारा पाळणा जसाच्या तसा स्मरणात आहे.
सांगली: भारतीय स्वातंत्र्याचा लढा दीर्घकाळ चालला होता. याच स्वातंत्र्यलढ्यादरम्यान युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, समता, बंधुभाव, विज्ञानाभिमुखता आदींची शिकवण देण्यासाठी राष्ट्र सेवा दल कार्यरत होते. या राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून गावोगावी बैठका भरवून लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत केली. देशभक्तीपर गीते, प्रार्थना, घोषणा, ओव्या, पाळणे, पोवाडे अशा लोकसाहित्याच्या माध्यमातून लोकजागृती केली जात होती.
जुना सातारा जिल्हा आणि सध्याचा सांगली जिल्हा स्वातंत्र्यलढ्यामध्ये हिरिरीने सहभागी होता. त्याकाळी खेडो-पाडी सेवा दलाच्या सभा भरत होत्या. या सेवा दलाच्या सभांमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत अनेकजण सहभागी होत असल्याचा अनुभव सांगली जिल्ह्यातील कुंडल गावच्या सरस्वती लुपणे यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितला.
advertisement
सरस्वती आजी सांगतात, "मी नऊ-दहा वर्षांची होते. तेव्हा माझ्या माहेरी पलूस येथे (जि.सांगली) मोकळ्या मैदानात सेवा दलाची सभा असायची. आम्ही सगळेजण सभेला जात होतो. तिथल्या प्रार्थना, देशभक्तीपर गीते, ओव्या, पाळणे आम्हालाही तोंडपाठ व्हायचे. स्वातंत्र्याच्या भावनेने बहरलेला तो काळ होता. प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार असायचा तो म्हणजे देशाचे स्वातंत्र्य."
देशभक्तीची भावना खोलवर रुजलेल्या सरस्वती आजींचं आजचं वय 92 वर्षे आहे. मात्र आजही त्यांना देश स्वातंत्र्याची भावना प्रेरित करणारा पाळणा जसाच्या तसा स्मरणात आहे. सेवा दलातील आठवणी सांगता सांगता सरस्वती आजींनी स्वातंत्र्यलढ्यावरील पाळणा म्हणून दाखवला.
advertisement
स्वातंत्र्य लढ्यातील पाळणा
पहिले नमन माझे हिंद मातेला
दुसरे नमन माझे राष्ट्र देशाला
तिसरे नमन माझे गांधीबाबाला
मातेच्या पोटी हिरा जन्मला
जो बाळा जो जो रे जो...
पहिल्या दिवशी पहिला प्रकार
रामगाड्याचा केलाय चुर
इंग्रज सरकार केलया चूर
बंदोबस्ताला गोरा लष्कर
जो बाळा जो
तिसऱ्या दिवशी तिसरा डाव
राम मनोहर लोहिया डॉक्टर
advertisement
रेडिओवरून बोलतो सारं
जो बाळा जो
पाचव्या दिवशी पाचवा येई
अरुणादेवी धावून जाई
साऱ्या देशाला संदेश देई
क्रांती देवीची पूजा करावी
जो बाळा जो
सहाव्या दिवशी सहावा फेरा
फुलं पाडून तोडिल्या तारा
आगगाडी तुम्ही बंदच करा
दिसल गोरा तिथेच धरा
जो बाळा जो
सातव्या दिवशी सातवा धडा
कोर्ट कचेरीवर मोरचा काढा
advertisement
पोस्ट ऑफिस बंदचं पाढा
नोकरशाहींनो नोकऱ्या सोडा
जो बाळा जो
आठव्या दिवशी अवतार आठवा
नाना पाटलाला लवकर भेटवा
गुंड लोकांना माघारी हटवा
जो बाळा जो
नवव्या दिवशी नवरत्न हार
नाना पाटील क्रांतीचा वीर
भूमिगत संगे घेऊन चाले
स्थापन केले पत्री सरकार
जो बाळा जो
दहाव्या दिवशी दहावा गुणं
साने गुरुजी माते प्रमाणं
advertisement
क्रांती देवीचे केले पालन
राष्ट्रसेवादल क्रांतीचे पान
जो बाळा जो
अकराव्या दिवशी आकार झाला
सुभाष बाबूंनी मंत्र दिला
आझाद सैनिकांनो जय हिंद बोला
एकजुटीने चला दिंडीला
जो बाळा जो
बाराव्या दिवशी बारावा रंग
लहान थोर झाले क्रांतीत दंग
साऱ्या देशात वाजले शिंग
इंग्रजाचे राज्य केले दुभंग
जो बाळा जो
राष्ट्र पाळणे इथून घोका
advertisement
काणीमंत्र बाळाचा "जयहिंद" फुका
तुकारामाची विनंती ऐका
जो बाळा जो
अशा पाळणा गीतातून स्वातंत्र्यलढ्याची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवली जात असल्याची आठवण सरस्वती आजी सांगतात. या लोकगीतांमुळे स्वातंत्र्याची भावना आणि देश प्रेमाचा प्रसार झाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
August 15, 2025 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Independence Day 2025: पहिल्या दिवशी..., 92 वर्षांच्या आजींनी गायला स्वातंत्र्य लढ्याचा पाळणा, पाहा संपूर्ण Video