घरात 4 मुली अन् 1 मुलगा; ‘त्या’ दोघींना बापानं उलटं का टांगलं? सांगलीतील थरकाप उडवणाऱ्या घटनेचं भयाण वास्तव
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Sangli News: आरोपी दादू यमगर हा दारूच्या नशेत अनेक वेळा क्रूर वागायचा, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.
सांगली: माणदेशी माणसं परिस्थितीनं गांजलेली पण सहनशील, संघर्षशील, प्रामाणिक अन् मऊ काळजाची मानली जातात. पण आटपाडीतील बनपुरीच्या घटनेनं इथला माणूस इतका निष्ठूर कसा झाला? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. बापानेच 2 मुलींना छताला उलटं टांगून ठेवल्यानंतर एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळतोय आणि बापाच्या निर्दयीपणावर संताप व्यक्त केला जातोय. आता याप्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येतेय.
नेमकं घडलं काय?
आटपाडी तालुक्यातील बनपुरी हे जेमतेम चार हजार लोकवस्तीचं गाव आहे. गावापासून दीड किलोमीटरवर यमगर वस्ती असून इथं क्रूरकर्मा दादू उर्फ दादा हैबची यमगर याचं दोन खोल्यांचं घर आहे. त्याला चार मुली अन् एक मुलगा अशी पाच अपत्यं आहेत. मोठी मुलगी वर्षा (वय 14), अनुजा (वय 11), मृत ऋतुजा उर्फ सानिका (9), माही (7) अन् सर्वात धाकटा पृथ्वीराज सहा वर्षांचा आहे. या मुलांसह त्यांची आई अन् आजी-आजोबा असं नऊ जणांचं हे कुटुंब या छोट्याशा घरात राहतं.
advertisement
शेजाऱ्यांनी नऊ वर्षाची सानिका आणि 11 वर्षांची अनुजा यांनी चोरी केल्यांचं सांगितलं. त्यामुळे व्यसनी बाप दादा यमगर संतापला. दोन्ही मुलींना 36 तास घरात तुळईला टांगले. एवढंच नाही तर तो त्याखालीच पत्नीसह झोपला. तर आजी-आजोबा बाहेर झोपले होते. सानिका रात्रभर पाणी पाणी करत होती. त्यातच तिचा जीव गेला. मात्र तिला शेवटपर्यंत कुणीही पाणी दिलं नाही.
advertisement
14 वर्षाच्या थोरल्या बहिणीला दया आली पण...
पाषाणहृदयी आई-वडिलांना पोटच्या गोळ्यांची दया आली नाही. उलट 14 वर्षाच्या मोठ्या बहिणीला दया आली. पण तिच्यासह इतर भावंडांनाही पाणी देण्यास आणि आक्रोश करणाऱ्या बहिणीजवळ जाण्यास बापाने कोयत्याचा धाक दाखवून अडवले. त्यामुळे अमानुष छळात सानिकाचे जागीच प्राण गेले. तर अनुजा गंभीर जखमी अवस्थेत आहे.
परस्पर अंत्यविधीचा प्रयत्न फसला
सानिकाचा तडफडून मृत्यू झाला. आणि तिची हत्या दडपण्यासाठी आई-वडील, आजी-आजोबा कुटुंबातील अशी सारीच मंडळी परस्पर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न करत होते. दुसरी मुलगी अनुजा ही तिकडे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. मात्र, उपचारादरम्यान ती शुद्धीवर आली आणि बापाने रात्रभर उलटे टांगल्याचे डॉक्टरांना सांगितले. घडला प्रकार समजताच डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत साऱ्या प्रकरणाचे बिंग फोडले.
advertisement
दारू, हिंसा आणि घरातील काळोख
आरोपी दादू यमगर हा दारूच्या नशेत अनेक वेळा क्रूर वागायचा, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. घरात नेहमीच भांडणे, वाद आणि मारहाण सुरू असायची. विशेष म्हणजे, ऋतुजा आणि अनुजा या दोनच मुलींना तो लक्ष्य करायचा. तर इतर मुलांवर कधीच हात उचलला गेला नाही. चार दिवसांपूर्वी गावातील यात्रेतही आरोपीचे भावासोबत मोठे भांडण झाले होते. या घरातील हिंसाचार आणि विकृत वागणूक ही नवीन नव्हती. मात्र समाजाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. त्यातच चिमुकलीचा बळी गेला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 12:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
घरात 4 मुली अन् 1 मुलगा; ‘त्या’ दोघींना बापानं उलटं का टांगलं? सांगलीतील थरकाप उडवणाऱ्या घटनेचं भयाण वास्तव







