सांगली जिल्ह्यातील 84000 'लाडक्या बहिणी' होणार का अपात्र? मानधन तात्पुरतं स्थगित; पडताळणी सुरू!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सांगली जिल्ह्यातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील 84 हजार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. महिला व बालविकास विभागाने केलेल्या सूचनेनुसार अंगणवाडी...
सांगली : विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील सांगली जिल्ह्यातील तब्बल 84 हजार महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे. या पडताळणीचा अहवाल पुढील आठ दिवसांत शासनाला सादर केला जाणार असून, तोपर्यंत या महिलांचे मानधन तात्पुरते स्थगित ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 129 लाभार्थ्यांनी स्वतःहून योजनेतून माघार घेतली आहे.
राज्यात 26 लाखांहून अधिक अर्जदारांचे मानधन थांबले
'लाडकी बहीण' योजनेतील सर्व पात्र अर्जांची ओळख पडताळणी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या विविध विभागांकडून माहिती मागवली आहे. यामध्ये काही लाभार्थी इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचे, किंवा एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे, जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात अशा 84 हजार महिलांची चौकशी सुरू झाली आहे. यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चौकशी करणार आहेत.
advertisement
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, वर्षा पाटील यांनी सांगितले की, "शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात 'लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी भेटी देऊन अर्जांची पडताळणी करतील. आठ दिवसांत जिल्ह्याचा अहवाल शासनाला पाठवण्यात येईल."
सांगली जिल्ह्याची आकडेवारी
- महिलांना मिळणारे मानधन : ₹1500
- जिल्ह्यातील एकूण लाभार्थी : 7,05,314
- पडताळणी सुरू असलेले लाभार्थी : 84000
- स्थगित मानधन (मासिक) : ₹12.60 कोटी
- पडताळणी सुरू : 1 ऑगस्ट 2025
- पडताळणी पूर्ण होण्याचा अंदाज : 10 ऑगस्ट 2025
advertisement
योजनेचे पोर्टल डिसेंबर 2024 पासून बंद असल्याने, नवीन अर्ज स्वीकारले जात नाहीत. यामुळे नवीन अर्जदारांना लाभ कधी मिळणार, अशी विचारणा होत आहे.
हे ही वाचा : लाभार्थी 19 हजार अन् अर्ज 84,000, नागपुरात लाडक्या बहिणींच्या पैशांवर कोण मारतंय डल्ला?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 12:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
सांगली जिल्ह्यातील 84000 'लाडक्या बहिणी' होणार का अपात्र? मानधन तात्पुरतं स्थगित; पडताळणी सुरू!