मनसेची शिंदेसेनेसोबत हातमिळवणी, संजय राऊत भडकले, राज ठाकरेंना म्हणाले....
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला साथ देण्याचे जाहीर केले आहे. मनसेच्या याच निर्णयाविरोधात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
मुंबई : एकत्र आलोय ते एकत्रित राहण्यासाठी असा प्रचार महापालिका निवडणूक काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाकडून करण्यात आला. मात्र निवडणुकीचा निकाल लागताच दोन्ही पक्षांच्या वाटा वेगळ्या झाल्याचे दिसते. कल्याण डोंबिवलीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला साथ देण्याचे जाहीर केले आहे. मनसेच्या याच निर्णयाविरोधात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
ज्यांनी शिवसेनेशी, ठाकरे कुटुंबाची बेईमानी केली त्यांच्याशी कोणतेही राजकीय वा अन्य संबंध ठेवायचे नाहीत, हे आमचे स्पष्ट आहे. महाराष्ट्रातल्या गद्दारांना मदत करणार नाही किंबहुना मदत होईल अशी भूमिकाही घेणार नाही. शिंदेंची शिवसेना ही आमच्यासाठी एमआयएम आहे. बेईमान आणि महाराष्ट्रद्रोही आहे. सत्ता येते-जाते, आम्ही सत्तेला हापापलेलो नाही. राज ठाकरेही सत्तेसाठी हापापलेले नाहीत. स्थानिक निर्णय म्हणून या विषयाकडे राज ठाकरे यांनी पाहू नये, असे संजय राऊत म्हणाले.
advertisement
राज ठाकरेंनी कारवाई करून निर्णय मान्य नसल्याचे दाखवून द्यावे
कल्याण डोंबिवलीतील ठाकरे बंधूंनी विषय गांभीर्याने घेतला आहे, हा अतिशय चिंतानजक विषय आहे. राजू पाटील सांगतात त्याप्रमाणे हा स्थानिक पातळीवरील निर्णय असू शकेल. पण पक्षाच्या मूळ ध्येयधोरणाशी प्रतारणा करून कोणत्याही पक्षाचे स्थानिक नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्षनेतृत्वाने भूमिका घ्यावी, थेटपणे कारवाई करून मला हा निर्णय मान्य नसल्याचे कारवाईतून दाखवून द्यावे, असे संजय राऊत राज ठाकरे यांना उद्देशून म्हणाले.
advertisement
कुणी बेडूक उड्या मारत असेल तर...
शिवसेना-मनसे एकत्रित निवडणूक लढले. एखाद्या चिन्हावर निवडून येऊन कुणी बेडूक उड्या मारत असेल तर नेतृत्वाने कारवाई करून आम्ही निर्णयाशी सहमत नाही, असे दाखवायला पाहिजे, असे सांगतानाच अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी असंग केला. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर त्या नगरसेवकांवर काँग्रेसने कारवाई करून पक्षातून हकालपट्टी केली, असा दाखलाही राऊत यांनी दिला. तसेच फक्त स्थानिक पातळीवरील निर्णय असे सांगून विषय संपत नाही, असेही ते म्हणाले.
advertisement
कल्याण डोंबिवलीतील मनसे-शिंदेसेना युतीला राज ठाकरेंचाही पाठिंबा नाही
शिंदेंची शिवसेना ही आमच्यासाठी एमआयएम आहे. बेईमान, महाराष्ट्रद्रोही आहे. काही लोकांच्या मागे तपास यंत्रणा लागल्या असतील. पण म्हणून पक्ष वेठीस धरून गद्दारांशी हातमिळवणी करणे पूर्णत: चुकीचे आहे. स्थानिक पातळीवर युती आघाडी झाली असेल तर पक्षनेतृत्वाने हस्तक्षेप करावा, त्यांच्यावर कारवाई करावी. कल्याण डोंबिवलीतील सेना-मनसेच्या युतीला राज ठाकरे यांचा पाठिंबा नाही, असे राऊत म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 4:55 PM IST








