BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BJP Thackeray Alliance: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. एक्झिट पोलमध्ये महायुतीला सरस यश दिसून येत असले तरी निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे
मुंबई: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. एक्झिट पोलमध्ये महायुतीला सरस यश दिसून येत असले तरी निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. निकालाच्या काही तास आधीच ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये पडद्याआड हातमिळवणीबाबत घडामोडी सुरू असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट-मनसे यांच्यात थेट लढत असल्याचे सांगण्यात येत आहे. एक्झिट पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दाखवण्यात येत आहे. त्यामुळे मतमोजणीची उत्सुकता दिसून येत आहे. भाजप आणि ठाकरे यांच्यात निकालानंतरच्या हातमिळवणीबाबत चर्चा झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये गुप्त हातमिळवणी झाल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केला आहे. 'वंचित'चे प्रवक्ते फारुख अहमद यांनी भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये साटेलोटे असून, निवडणूक निकालानंतर महापौरपदाच्या निवडीपर्यंत एकत्र येण्याच्या शक्यतेवरून दोन्ही बाजूंमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा आरोप केला.
>> मातोश्रीवर आलेला नेता कोण?
फारुख अहमद यांच्या म्हणण्यानुसार, मतदानाच्या आदल्या रात्री मातोश्रीवर भाजपच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यालयातून ‘मिश्रा’ नावाचे एक व्यक्ती आले होते. त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा त्यांनी केला. “मतदानाच्या दिवशी कोणकोणत्या जागांवर परस्पर मदत करायची, याबाबत दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती आमच्याकडे आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
advertisement
मातोश्री निवासस्थानी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याचे नमूद करत, रात्री तीन वाजता कोण आले, कोणाची भेट झाली, याची माहिती जनतेसमोर यावी, अशी मागणीही फारुख अहमद यांनी केली. तसेच, संविधानवादी आणि धर्मनिरपेक्ष मतदारांनी ठाकरे बंधूंचे कथित राजकीय डावपेच ओळखावेत, असे आवाहन करत त्यांनी या कथित गुप्त भेटीवरून सत्ताधाऱ्यांवर आणि ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 8:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा









