ठाकरे गटात नाराजीनाट्य, शिवसेनेच्या घडामोडी वाढल्या, महापौर निवडीआधीच वादाची ठिणगी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
एकीकडे महायुतीतील वाद सुरू असताना महापौर निवडणुकीच्या आधी शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर महायुतीत महापौर पदावरून रस्सीखेच सुरू आहे. अडीच वर्षे महापौर पद मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप यावर काहीच तोडगा निघाला नाही. एकीकडे महायुतीतील वाद सुरू असताना महापौर निवडणुकीच्या आधी शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची पालिकेतील गटनेते पदी वर्णी लावण्यात आल्यानंतर पक्षात नाराजीचा सूर उमटला आहे. विशेषतः सर्व महत्त्वाची पदे 'वरळी' विधानसभा मतदारसंघातच का? असा संतप्त सवाल आता शिवसैनिकांकडून विचारला जात आहे.
ज्येष्ठांना डावलल्याचा आरोप
शिवसेनेच्या या विजयानंतर मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकरे, विशाखा राऊत आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांसारखी मातब्बर आणि अनुभवी मंडळी निवडून आली आहेत. या अनुभवी नेत्यांना बाजूला सारून पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांनाच झुकते माप दिल्याने पक्षात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कोरोना काळातील आरोप आणि वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला हे महत्त्वाचे पद का दिले, असा प्रश्न ज्येष्ठ नगरसेवकांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे.
advertisement
'वरळी'वर पदांची खैरात?
नाराजीचे मुख्य कारण म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघाला मिळणारे झुकते माप. सध्या वरळीमध्ये दोन आमदार आहेत. माजी महापौर आणि माजी उपमहापौर याच भागातील आहेत. बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषवलेले ज्येष्ठ माजी नगरसेवकही याच मतदारसंघातील आहेत. आता पुन्हा पालिकेतील गटनेतेपदही वरळीतील प्रभागातून निवडून आलेल्या किशोरी पेडणेकर यांनाच मिळाल्याने, शिवसेनेच्या इतर विभागांतील कार्यकर्त्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.
advertisement
तिकीट वाटपापासूनच होता विरोध
किशोरी पेडणेकर या तडफदार आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जात असल्या तरी, मध्यंतरीच्या काळात त्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यांच्या स्वतःच्या प्रभागातही त्यांच्याबद्दल नाराजी होती. असे असतानाही पक्षाने त्यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली आणि आता थेट गटनेते पद बहाल केले, यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे.
advertisement
एकीकडे पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न शिवसेना करत असताना, दुसरीकडे घराणेशाही किंवा विशिष्ट मतदारसंघाला (वरळी) दिले जाणारे प्राधान्य यामुळे मुंबईतील इतर विभागांतील नेते नाराज झाले आहेत. ही नाराजी आगामी काळात ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 9:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाकरे गटात नाराजीनाट्य, शिवसेनेच्या घडामोडी वाढल्या, महापौर निवडीआधीच वादाची ठिणगी









