दोडामार्गमध्ये शाळेत घुसले हत्ती, कौलं-शाळेतल्या स्क्रीन फोडल्या
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग घोटगे परिसरात हत्तींच्या हल्ल्यामुळे प्राथमिक शाळा आणि शालेय साहित्याचे मोठे नुकसान झाले असून ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीची मदत मागितली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालच्या पट्ट्यात हत्ती गावात उतरले आहेत. हत्तीने धुडगूस घातल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. दोडामार्ग इथे घोटगे परिसरात गेल्या काही दिवसांपासून हत्ती धुडगूस घालत आहेत. हत्तींमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ वैतागले असून तातडीनं यांचा बंदोबस्त तयार करण्याची मागणी केली आहे. हत्तींचा धुडगूस सुरू असून रविवारी सकाळी गावातील प्राथमिक शाळा हत्तींच्या हल्ल्यात कोसळली.
हत्तींनी शाळेवर हल्ला केला. यामध्ये संगणक, लॅपटॉपसह शालेय साहित्याचे मोठं नुकसान झालं. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास शाळेत घुसलेल्या हत्तींच्या कळपाने शाळेची इमारत पाडली. शाळेचे छप्पर कोसळले. इमारतीसह आतील संगणक, लॅपटॉप, बेंच, टेबल, खुर्च्या यांचंही मोठं नुकसान झालं.
या हत्तींच्या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली असून गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या नुकसानीनंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकसान झालेलं साहित्य तात्काळ उपलब्ध करुन द्यावं यासाठी ग्रामस्थ आणि शिक्षकांनी मागणी केली आहे. शाळेची इमारत दुरुस्त करावी अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे.
advertisement
हत्तींनी शाळेच्या आजूबाजूच्या झाडांचं देखील मोठं नुकसान केलं. ही झाडं शाळेवर कोसळून शाळेचं नुकसान झालं आहे. शाळेची कौलं फुटली, भिंतीचंही नुकसान झालं. त्यामुळे आता मुलांना पावसाळ्यात बसवायचं कुठे असा प्रश्न ग्रामस्थ आणि शिक्षकांसमोर आहे.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
September 20, 2025 1:38 PM IST