ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी, मयूरचा जागेवर जीव गेला, करमाळ्याची घटना
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मयूर क्षीरसागर हा भैरवनाथ साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना उतारावर ट्रॅक्टरवरील ट्रॉलीचा ताण वाढल्याने ट्रॅक्टरचा तोल गेला आणि वाहन पलटी झाले.
करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात वीट गावाजवळ पाझरतलाव परिसरात शनिवारी सकाळी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात मयूर क्षीरसागर या तरुण चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर क्षीरसागर हा आपल्या ट्रॅक्टरमधून भैरवनाथ साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात होता. पाझर तलावाजवळील उताराच्या भागातून ट्रॅक्टर जात असताना ट्रॉलीवरील ऊसाचे ओझे वाढल्याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. ट्रॉलीचा ताण वाढल्याने ट्रॅक्टरचा तोल गेला आणि वाहन पलटी झाले. अपघात इतका भीषण होता की मयूर ट्रॅक्टरखाली सापडून जागीच मृत झाला.
घटनेनंतर काही क्षणातच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी मयूरला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आणि अपघाताची नोंद घेतली. पुढील तपास सुरू आहे.
advertisement
मयूर क्षीरसागर हा मेहनती आणि मनमिळावू स्वभावाचा तरुण म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अकाली निधनाने गावात शोककळा पसरली असून, नातेवाईक आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऊस वाहतुकीदरम्यान ट्रॉलीचा ताण आणि वाहनाचे ओझे यामुळे दरवर्षी अनेक अपघात घडत असतात, याकडे स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 09, 2025 7:11 PM IST


