रात्री जेवून घरात झोपलं 5 जणांचं कुटुंब, सकाळी सगळेच बेशुद्ध, 2 चिमुकल्यांचा मृत्यू, सोलापूरातील खळबळजनक घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Solapur News: सोलापूर शहरातील सिव्हील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्धावस्थेत आढळले आहेत.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर शहरातील सिव्हील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्धावस्थेत आढळले आहेत. या दुर्दैवी घटनेत सहा वर्षांचा मुलगा हर्ष आणि चार वर्षांची मुलगी अक्षरा यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापुरातील लष्कर भागात सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली आहे. हे कुटुंब शनिवारी रात्री जेवण करून आपल्या घरात झोपलं होतं. मध्यरात्री खोलीत झालेल्या वायू गळतीमुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील बेडरफुलजवळ युवराज मोहन सिंग बलरामवाले (वय ४०) यांचं कुटुंब राहातं. त्यांच्या कुटुंबात पत्नी रंजना (वय ३५), आई विमल (वय ६०), मुलगा हर्ष (वय ६) आणि मुलगी अक्षरा (वय ४) अशा पाच जणांचा समावेश आहे. युवराज बलरामवाले हे गोवंडी म्हणून काम करतात. तर पत्नी रंजना विडी कामगार आहेत. बेडरफुलजवळ त्यांचं दहा बाय पाचचं छोटंसं घर आहे. याच घरात पाच जणांचं कुटुंब राहतं.
advertisement
घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री हे कुटुंब रात्री जेवण घरून हवा बंद खोलीत झोपलं होतं. रात्री झोपताना गॅस व्यवस्थित बंद न केल्यामुळे दहा बाय पाचच्या हवा बंद खोलीत वायू गळती झाली, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध झाले. रंजना यांच्यासोबत काम करणाऱ्या महिला विडीचे पत्ते घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या असता, त्यांना हे कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळले. यानंतर त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना माहिती दिली आणि सर्वांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान हर्ष आणि अक्षरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
advertisement
प्राथमिक अंदाजानुसार, गॅस गळतीमुळे गुदमरून हे कुटुंब बेशुद्ध झाले असावे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून, कुटुंबाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Sep 01, 2025 8:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
रात्री जेवून घरात झोपलं 5 जणांचं कुटुंब, सकाळी सगळेच बेशुद्ध, 2 चिमुकल्यांचा मृत्यू, सोलापूरातील खळबळजनक घटना









