Solapur Lok Sabha : शिंदेंची लेक दिल्ली गाठणार की सातपुते डाव उलटवणार? Exit Poll चा अंदाज
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सोलापूर लोकसभा मतदासंघात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाल्याची चर्चा आहे.
सोलापूर, प्रीतम पंडित, प्रतिनिधी : सोलापूर लोकसभा मतदार संघात यंदा दोन तरुण आमदारांची तगडी फाईट पाहायला मिळाली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून आमदार राम सातपुते यांना तर महाविकास आघाडीकडून आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात 59 टक्के मतदान झाले आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 0.78 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा दोन्ही उमेदवारांच्या विजयात निर्णायक भूमिका पार पाडणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्थ्यावर पडतो हे चार जूनलाच कळणार आहे.
भाजपकडून माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांना ऐनवेळी दिलेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरली होती. तर काँग्रेसकडून सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन महिनेआधीच आपल्या प्रचाराचा नारळ फोडला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने ऐनवेळी घेतलेली माघार, त्यानंतर वंचितकडून अपक्ष आतिश बनसोडे यांना दिलेला पाठिंबा काँग्रेसला बळ देणारा ठरला आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यामध्ये या मतदारसंघात थेट लढत आहे.
advertisement
अटीतटीची लढत
सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन तरुण आमदारांची चुरस प्रत्यक्ष पाहायला मिळाली. भाजपकडून राम सातपुते यांची मदार मतदारसंघातील पाच आमदारांवर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा राम सातपुते यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरल्या, तर काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघ पिंजून काढत प्रचारात आघाडी घेतली . प्रणिती शिंदे यांच्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वतः मैदानात उतरले होते. दोन्हीही युवा आमदारांनी प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रणिती शिंदे यांनी प्रचारात प्रत्येक ठिकाणी आघाडी घेतल्याचे दिसून आले. सोलापुरातील दोन्ही आमदारांचा सामना हा कट टू कट झाल्याचे बोलले जात आहे..
advertisement
वाढलेला मतदानाचा टक्का निर्णायक
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील वाढलेली टक्केवारी निर्णायक ठरणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 59 टक्के मतदान झाले आहे. 2019 साली मतदारसंघात 58 टक्के मतदानाची नोंद झाली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत 0.78 टक्क्याने मतदान वाढले आहे. मोहोळ आणि दक्षिण सोलापुरातील मतदानाचा वाढलेला टक्का निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
advertisement
या मुंद्यांमुळे गाजली निवडणूक
- राम सातपुते यांनी प्रचारात मुद्दे आणताना विकासाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला होता.
- शिंदे कुटुंबीयांवर केलेला परिवारवादाचा आरोप
- माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी गेल्या चाळीस वर्षांत सोलापूरचा विकास न केल्याचा आरोप
- सोलापुरातील धार्मिक विषयांवर केलेली विधानं
- प्रणिती शिंदे यांचा भगिनी असा केलेला उल्लेख
advertisement
प्रणिती शिंदे
- आमदार प्रणिती शिंदे यांनी उपरा उमेदवार म्हणून राम सातपुतेंवर केलेली टीका
- सोलापुरातील अनेक रखडलेले विकास कामे कळीचा मुद्दा बनवले.
- आमदार प्रणिती शिंदे यांची आक्रमक विधाने चर्चेचा विषय ठरले
मराठा आरक्षण ठरला कळीचा मुद्दा
सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची निर्णायक मते आहेत. मात्र यंदा सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळे लिंगायत समाजाच्या मतदानामध्ये फूट पडली. तर मुस्लिम समुदायाने मोठ्या प्रमाणावर मतदान करून काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला. सोलापूर पंढरपूर मोहोळ विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाची भूमिका मतदार संघात निर्णायक ठरणार आहे.लोकसभा मतदारसंघातील ओबीसी मतदारांनी मात्र भाजपला साथ दिल्याचे दिसून आले. मात्र या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत राहिला.
advertisement
सुशील कुमार शिंदे यांचा पराभव
2014 आणि 2019 साली नवख्या असणाऱ्या भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडून माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा दारून पराभव झाला होता. 2019 साली प्रकाश आंबेडकर यांच्या मतांची टक्केवारी निर्णायक ठरल्यामुळे सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. 2019 साली भाजपने लिंगायत मतांसाठी धर्मगुरू डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी यांना मैदानात उतरवल्यानं पक्षाला लिंगायत समाजाची एक गठ्ठा मतं मिळाली.
advertisement
मतदार संघातील बदललेले राजकीय समीकरण
सोलापूर लोकसभा मतदारसंघावर भाजपचे एक हाती वर्चस्व दिसून येते. भाजपचे चार तर सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे. तर दुसरीकडे आमदार प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसचा एकच आमदार इथे आहे. अकलूजच्या मोहिते पाटील गटांने शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. ग्रामीण भागात मराठा आरक्षणाची झळ दिसून आली. राम सातपुते यांच्यासाठी उत्तर सोलापूर, अक्कलकोट हे विधानसभा मतदारसंघ तर प्रणिती शिंदे यांच्यासाठी पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे जिंकण्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
Location :
Solapur,Solapur,Maharashtra
First Published :
June 01, 2024 5:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Lok Sabha : शिंदेंची लेक दिल्ली गाठणार की सातपुते डाव उलटवणार? Exit Poll चा अंदाज