अजितदादांना सुनावलं, धनुभाऊंवर हल्लाबोल, मेहुण्यालाही सोडलं नाही, सुरेश धस यांचं आक्रमक भाषण
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Parbhani Morcha: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींच्या कठोर शिक्षेच्या मागणीकरिता परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात होते.
परभणी : धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर करण्याची मागणी जोर धरू लागलेली असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मात्र मौनव्रत धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतलेले भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांना जोरदार लक्ष्य केले. बीड आणि परळी जिल्ह्यात आतापर्यंत खुनांची मालिका झाली. या हत्या कुणी केल्या? खुनाचे मास्टरमाईंड कोण आहेत? याचा शोध घ्या, असे सांगतानाच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का ठेवले आहे? अजितदादा तेरा वादा क्या हुआ रे...असा बोचरा सवाल सुरेश धस यांनी केला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींच्या कठोर शिक्षेच्या मागणीकरिता परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात होते. या मोर्चाला भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार राजेश विटेकर, मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे आदी नेते उपस्थित होते. या मोर्चाला संबोधित करताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबतच अजित पवार यांना लक्ष्य केले.
advertisement
...तर धनंजय मुंडे यांनी जेलची तयारी करावी
आका (वाल्मिक कराड) जेलमध्ये गेलाय. आता आकाच्या आकाचा (धनंजय मुंडे) यांचाही नंबर लागू शकतो. कारण यांची प्रकरणं थेट माणसं मारण्यापर्यंत येऊन ठेपली आहेत. आमच्या लेकराने तुमचं काय बिघडवलं होतं? एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला आमचा संतोष गेला होता. जर आकाने त्याच्या आकाला मारहाणीचा व्हिडीओ दाखवला असेल.. तर त्यांनीही जेलची तयारी करावी, असा इशाराच सुरेश धस यांनी दिला.
advertisement
...नाहीतर लोक विचारतील, क्या हुआ तेरा वादा....?
काही कारणास्तव माझ्या पक्षाकडून मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. पण मी अजितदादांना म्हटलं. पाच टर्म आमदार असणाऱ्या प्रकाश सोळंके यांना मंत्री करा, राजेश विटेकर यांना मंत्री करा आणि दोन्हीही नाही जमले तर बुलडाण्यातून निवडून आलेल्या कायंदे यांना मंत्री करा. हवे तर आमचा जिल्हा मंत्रिपदाविना ठेवा. काही फरक पतड नाही. पण या आकाच्या आकाला (धनंजय मुंडे) यांना मंत्रिपदावरून दूर करा. नाहीतर लोक विचारतील, क्या हुआ तेरा वादा.... असे सुरेश धस म्हणाले.
advertisement
अजितदादा, बीडमधील दहशत पाहण्यासाठी बारामतीहून माणसं पाठवा
बीडमध्ये संदीप दिघोळेपासून संतोष देशमुखपर्यंतच्या हत्या कुणी केल्या याच्या तपासाकरिता अजित पवार तुम्ही बारामतीहून माणसं पाठवावीत. बीड आणि परभणीला जिल्ह्यात बारामतीच्या माणसांनी येऊन येथील दहशतीची चौकशी करा. हजारो लोक गावं आणि शहरं सोडून गेली आहेत, हे तुम्हाला मान्य आहे काय? असा सवाल करून धनंजय मुंडे यांची दहशत सांगत सुरेश धस यांनी अजित पवार घेरले.
advertisement
धनंजय मुंडे यांच्या मेहुण्यालाही सोडले नाही
आजच्या मोर्चाला गंगाखेडचे भावोजी (धनंजय मुंडे यांचे मेहुणे मधुसूदन केंद्रे) का नाही आले? याला डबल पॉलिसी म्हणतात. खुल्लमखुल्ला यायले हवे होते. आजचा मोर्चा सर्वपक्षीयांचा मोर्चा आहे, अशी टोलेबाजीही सुरेश धस यांनी केले.
Location :
Parbhani,Maharashtra
First Published :
January 04, 2025 3:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांना सुनावलं, धनुभाऊंवर हल्लाबोल, मेहुण्यालाही सोडलं नाही, सुरेश धस यांचं आक्रमक भाषण