उदय सामंत एकनाथ शिंदेंची जागा घेणार? उपमुख्यमंत्री बनणार? अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट, पोस्ट लिहित म्हणाल्या...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यात काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यात काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अंधारे यांनी उदय सामंतांबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. ते शिंदे गटातील काही आमदारांना खासदारांना घेऊन भाजपात जातील, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर उदय सामंत यांनी अंधारेच आमच्या पक्षात येण्यास इच्छुक होत्या. यासाठी त्यांनी दिल्लीत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतली होती, असा दावा केला.
यानंतर सुषमा अंधारे यांनी फेसबूक पोस्ट लिहित उदय सामंत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांची उपमुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे. शिवाय त्यांनी दिल्लीत खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत झालेल्या भेटीवर देखील भाष्य केलं आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
सुषमा अंधारे यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं की, "प्रिय उदयभाऊ, आज एका जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही शिंदेंमुळे दखलपात्र झाला आहात हे मान्य केले. पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी दिले. त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून राष्ट्रवादीने ओळख तयार केली. तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक मुत्सद्दी राजकारणी आहात हे सिद्ध केले. शिवसेनेकडून श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना आपण सत्तेसाठी कुणासोबतही जाऊ शकता हे सिद्ध केले."
advertisement
"उदयभाऊ , आता उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्त्वकांक्षा मी उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? माझ्यामुळे आपल्या सुप्त इच्छा जगजाहीर झाल्या आहेत का? कदाचित त्यामुळेच आपण आज वैतागून माझी आणि नरेश म्हस्के यांची भेट झाल्याचे मुलाखतीत सांगत होतात. होय माझी आणि नरेश म्हस्के यांची नक्की भेट झाली. भेट घेतली नाही; भेट झाली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या उपहारगृहामध्ये चहासाठी बसल्यानंतर भेट झाली. माझ्या समवेत माझ्या पक्षाचे खा. भाऊसाहेब वाकचौरे, बाजूला खा. भगरे गुरुजी असताना आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बसलेले असताना माझी भेट झाली. विशेष ही भेट झाल्यावर मी सगळ्यात आधी माझ्या पक्षप्रमुखांना ही माहिती दिली हे कदाचित आपल्याला माहित नसेल. पण तरीही मी समजूच शकते," अशा शब्दात अंधारेंनी सामंतांना टोला लगावला आहे.
advertisement
"उदय भाऊ, आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात. आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलं तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आपला वार अगदीच बेकार गेला आहे. या निमित्ताने का असेना माझं बोलणं हे तुमच्या फार जिव्हारी लागलंय हे लक्षात आलं. #ताजकलम _ तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं आम्हालाही बोलवा बरं का..." असंही अंधारे म्हणाल्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 7:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उदय सामंत एकनाथ शिंदेंची जागा घेणार? उपमुख्यमंत्री बनणार? अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट, पोस्ट लिहित म्हणाल्या...


