Tejasvee Ghosalkar: 'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, मनातलं सगळं सांगितलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा हा स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. तर, भाजपची ताकद वाढणार आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी एका पोस्टमधून आपल्या मनातलं सगळंच सांगितलं आहे.
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. तर, ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा हा स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. तर, भाजपची ताकद वाढणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर घोसाळकर यांचा प्रभाग आरक्षित झाला होता. त्यानंतर त्यांनी प्रभाग आरक्षित झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आपण पक्षाचे काम जोमाने सुरू ठेवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांमध्ये तेजस्वी घोसाळकरांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. अखेर आज सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.
advertisement
आयुष्यात असा क्षण कधी येईल, आणि मला असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन जड आहे. शब्द अपुरे पडत आहेत, पण तरीही हा संवाद आवश्यक असल्याचे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटले.
तेजस्वी घोसाळकरांनी मनातलं सगळं सांगितलं...
तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मनातलं सगळंच सांगून टाकलं. नाती बदलू शकतात, पण ऋणानुबंधन नाहीत अशी कॅप्शन देत तेजस्वी यांनी मनातली गोष्ट सांगितली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी कधीही असे म्हणणार नाही की, माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक 1 असो वा इतर भाग तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावे लागत असल्याचे घोसाळकरांनी सांगितलं
advertisement
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये काय म्हटले?
प्रिय सहकारी शिवसैनिक बंधू-भगिनींनो...
आज आपल्याशी संवाद साधताना माझे मन प्रचंड उद्विग्न झाले आहे. आयुष्यात असा क्षण कधी येईल, आणि मला असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन जड आहे. शब्द अपुरे पडत आहेत, पण तरीही हा संवाद आवश्यक आहे.
advertisement
मी, तेजस्वी अभिषेक घोसाळकर, एक अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी, घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचे साधन नव्हते; सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकले. लोकांमध्ये राहणे, त्यांची कामे करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यातच मला खरा आनंद मिळत गेला. सगळं काही छान सुरू असताना, अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर-बोरिवलीतील आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्नं पाहत होतो. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला.अभिषेकची निघृण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली. त्या घटनेनं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. दोन लहान लेकरं, मोडकळीस आलेलं मन, आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण पडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेला आहे. पण आजची परिस्थिती वेगळी आहे, असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.
advertisement
advertisement
आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना, आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी मला केवळ पदाची नव्हे, तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे. मी कधीही असे म्हणणार नाही की, माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून, माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक 1 असो वा इतर भाग तसेच माझ्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावे लागत आहे. तरीही एक गोष्ट मी ठामपणे सांगते, माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही. मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथे जिथे, जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन, असं तेजस्वी घोसाळकरांनी सांगितले.
advertisement
आजही मी तुम्हाला शब्द देते- जात-धर्म-पक्ष-विचार न पाहता, जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल, तेव्हा कोणताही विचार न करता मी धावून येईन. अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरले आहे, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची काळजी घेणे. आज आपणच माझा परिवार आहात. म्हणून बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल, अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधीही तडा जाऊ देणार नाही. आपले प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो, हीच प्रार्थना, असं तेजस्वी घोसाळकर म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 10:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tejasvee Ghosalkar: 'नाती बदलू शकतात पण...', अखेर तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, मनातलं सगळं सांगितलं










