कॅमेरा अन् ती! फोटोग्राफर व्हायचं होतं, आज क्लिक करते लाखोंचं हास्य
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
सेजल बने यांनी या क्षेत्रात करियर करण्याचं स्वप्न अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून पाहिलं होतं. 2013 सालापासून त्यांनी स्वतःची आवड जपत दिवा शहरातील मुंब्रा कॉलनीत स्वतःचा फोटो स्टुडिओ सुरू केला.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
डोंबवली : महिला आता प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर दिसतात. अगदी रिक्षाचालक महिलासुद्धा पाहायला मिळतात, परंतु तुम्ही कधी फोटो स्टुडिओमध्ये महिलांना कॅमेरा हातात घेऊन काम करताना पाहिलंय का?
शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण पासपोर्ट साईज फोटो किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी फोटो काढायचे असतील तर स्टुडिओमध्ये जातात. तिथे कॅमेरा आर्टिस्ट असतात जे आपले उत्तम फोटो काढतात. परंतु ते बऱ्याचदा पुरुषच असतात. मात्र आता या फोटोग्राफी क्षेत्रात महिलासुद्धा पुढे येताना पाहायला मिळतात. मागील 10 वर्षांहून अधिक काळापासून दिवा शहरातील रहिवासी सेजल बने या स्वतःचा फोटो स्टुडिओ सांभाळतात.
advertisement
हेही वाचा : प्रसिद्ध मासोळी अन् चिकन फ्राय, 16 वर्षांपासून प्रणिता चालवतात दिवा शहरात सेंटर, खवय्यांची मोठी गर्दी
सेजल बने यांनी या क्षेत्रात करियर करण्याचं स्वप्न अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून पाहिलं होतं. 2013 सालापासून त्यांनी स्वतःची आवड जपत दिवा शहरातील मुंब्रा कॉलनीत स्वतःचा फोटो स्टुडिओ सुरू केला. 'श्रेया फोटो स्टुडिओ' असं त्यांच्या स्टुडिओचं नाव. विशेष म्हणजे सेजल यांना या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्या पतीची म्हणजेच सागर बने यांची विशेष साथ मिळाली. घर सांभाळून स्त्रिया उत्तमरित्या नोकरी किंवा व्यवसाय करतात याचं सेजल उत्कृष्ट उदाहरण आहेत. त्यांना 2 लहान मुलं आहेत. त्यांचा मुलगा 7 वर्षांचा आणि मुलगी 13 वर्षांची आहे. या मुलांचं व्यवस्थित संगोपन करून त्या स्टुडिओ सांभाळतात. पतीच्या साथीमुळेच त्या दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळू शकतात, असं त्या सांगतात.
advertisement
'माझ्या या संपूर्ण प्रवासात माझ्या मिस्टरांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी साथ दिली म्हणून स्वतःचा फोटो स्टुडिओ सुरू करण्याचं धाडस मी करू शकले. प्रत्येक स्त्री आपलं स्वप्न पूर्ण करू शकते फक्त तिने प्रयत्न करायला हवे', असं सेजल म्हणाल्या. त्यामुळे जशी एका यशस्वी पुरुषामागे एक खंबीर स्त्री असते असं म्हणतात, त्याप्रमाणे एका यशस्वी स्त्रीमागे एक खंबीर पुरुष असतो, असं सेजल यांच्याकडे पाहून वाटतं. दरम्यान, सेजल या सर्व शुभकार्यांचे फोटोशूट, वेडिंग फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग करतात.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
June 17, 2024 7:25 PM IST

