Barsu Refinery : कोकणातील रिफायनरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; G20 परिषदमुळे पडली वादाची ठिणगी

Last Updated:

Barsu Refinery : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

कोकणातील रिफायनरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
कोकणातील रिफायनरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
रत्नागिरी, 12 सप्टेंबर (सचिन सावंत, प्रतिनिधी) : सोमवारी जी 20 परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून चर्चा झाली. त्यानंतर या प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प बारसू येथे होणार हे जवळ जवळ निश्चित झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विरोधक आणि समर्थक यांच्यात कलगीतुरा रंगणार हे निश्चित.
काय आहे रिफायनरीचा इतिहास?
या साऱ्या घडामोडी घडत असताना मुळात कोकणातल्या रिफायनरीचा इतिहास, त्या संदर्भातील घडामोडींकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. ऑगस्ट 2016 मध्ये रत्नागिरी जिल्हा कार्यालयात दक्षता समितीच्या बैठकीदरम्यान तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी कोकणात येणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाची माहिती दिली. त्यावेळेस प्रकल्पाचे स्थान निश्चित करण्यात आले नव्हते. त्यानंतर एमआयडीसी कायद्याअंतर्गत जमीन अधिग्रणाची अधिसूचना 18 मे 2017 रोजी प्रसिद्ध झाली. पण 2019 च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची युती झाली. आणि युती करतानाची प्रमुख अट म्हणून 2 मार्च 2019 रोजी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द झाली. अर्थात स्थानिकांचा विरोध हा जरी यातील महत्त्वाचा मुद्दा असला तरी राजकीय पक्षांनी घेतलेली सोईस्कर भूमिका याकडे डोळेझाक करून चालणार नाही.
advertisement
कोकणात रिफायनरी प्रकल्प आल्यास त्यातून काय मिळणार?
प्रकल्पाची घोषणा झाली. त्यावेळी प्रकल्पाकरीता सुमारे तीन लाख कोटींची गुंतवणूक प्रस्तावित होती. प्रकल्पामुळे सुमारे एक ते दीड लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा होती. प्रकल्पाची क्षमता सुमारे 60 MMTPA इतकी होती. सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प 20 MMTPA इतक्या क्षमतेचा प्रस्तावित आहे. 60 MMTPA करीता सुमारे सुमारे 15 हजार एकर इतकी जमीन अपेक्षित होती. तर 20 MMTPA करीता सुमारे 6000 ते 6500 हजार एकर इतकी जमीन अपेक्षित आहे.
advertisement
या साऱ्या गोष्टींकडे पाहत असताना मोठ्या प्रमाणात वाढणारं प्रदूषण, निसर्गाचा होणारा विनाश आदी मुद्द्यांवर सध्या विरोध केला जात आहे. पण त्याच वेळेला आम्ही विनाशकारी प्रकल्पांशिवाय इतर प्रकल्पांचा स्वागत करू अशी स्थानिकांची भूमिका आहे. तसेच कितीही समित्या स्थापन झाल्या तरी या प्रकलपाला विरोध कायम राहणार, असे विरोधक सांगतात
कोकणातल्या रिफायनरीचा प्रवास
2016 मध्ये कोकणात रिफायनरी प्रस्तावित करण्यात आली. त्यानंतर 2017 मध्ये राजापूर तालुक्यातील नाणार इथं जमीन अधिग्रहणाचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी सुरुवातीला स्थानिकांसह शिवसेना देखील विरोधात होती. त्यानंतर 2019 च्या लोकसभा आणि विधानसभेसाठी शिवसेना भाजपची युती झाली आणि कोकणातील नाणार येथील रिफायनरी रद्द करत असल्याची घोषणा संयुक्तिक पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. त्यानंतर 2020-2021 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना बारसू आणि सोलगाव या राजापूर तालुक्यातील गावांमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव मांडला गेला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहुन रिफायनरीबाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं कळवलं. पण जून 2022 मध्ये स्थानिकांनी रिफायनरीचा सर्व्हे रोखला आणि त्यानंतर पुन्हा एकदा बारसू आणि सोलगावमध्ये रिफायनरी विरोध पुढे आला.
advertisement
बारसू-सोलगावबद्दल बोलत असताना 2022 या वर्षात कोकणातील रिफायनरी चर्चेत राहिली ती विरोधातील आंदोलनामुळे. नाणार इथं रद्द झालेल्या रिफायनरीच्या उभारणीसाठी सध्या राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगांव इथं चाचपणी सुरू आहे. त्याविरोधात राजापूर तालुक्यात मागच्या वर्षी जून ते ऑगस्टमध्ये आंदोलने झाली. बारसूच्या याच सड्यावर रिफायनरी विरोधकांनी भाजप नेते आणि नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र नितेश राणे यांची गाडी देखील अडवली. त्यानंतर 11 सप्टेंबर रोजी नाना पटोले यांच्या उपस्थित सभा झाली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात जहरी भाषा वापरली गेली. त्यानंतर रिफायनरी विरोधकांचे नेते नरेंद्र जोशी यांना झालेल्या मारहाणीनंतर रिफायनरी विरोधकांनी 12 सप्टेंबर 2022 रोजी थेट राजापूर पोलीस स्टेशनसमोर मध्यरात्रीपर्यंत धरणे आंदोलन केले. या साऱ्या घडामोडीनंतर उपविभागीय अधिकारी लांजा यांनी रिफायनरी विरोधकांचे नेते अमोल बोळे, सत्यजित चव्हाण, नरेंद्र जोशी, दिपक जोशी, नितीन जठार, सतीश बाणे यांनी तडीपारी का करण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली. या साऱ्या गोष्टीचा विचार केल्यास विरोधाची धार तीव्र अशीच दिसून आली.
advertisement
त्यानंतर जवळपास सात महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर 23 एप्रिलला रिफायनरी प्रकल्पासाठी मातीपरीक्षण होणार असल्याची कुणकुण स्थानिकांना लागली आणि परत एकदा ग्रामस्थ एकटवले. पण त्या दिवशी सर्व्हेक्षणाच्या दृष्टीने कोणीच तिकडे फिराकले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी 24 एप्रिलला 144 कलम लागू केले गेले आणि पहाटेच सर्व पोलीस फौजफाटा संबंधित सर्व यंत्रणा अधिकारी बारसू सड्यावर दाखल झाले. त्यावेळी स्थानिकांनी विरोध करत मोठे आंदोलन विरोधकांकडून उभारण्यात आले. मात्र, काहींना अटक झाली तर काहींना परीक्षण स्थळावरून हटावण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर माती परीक्षणासाठी ड्रीलिंगचे काम सुरु झाले, हे काम 4 दिवस सुरळीत सुरू असताना 28 एप्रिलला परत एकदा मोठे आंदोलन ग्रामस्थांनी उभे केले व ज्या ठिकाणी सर्वेक्षण सुरू होते त्या ठिकाणी घुसून पोलिसांच्या नाकी नऊ आणले.
advertisement
या दरम्यान पोलीस आणि स्थानिक आंदोलक यांच्यामध्ये झटापट होऊन यावेळी लाठीचार्ज व अश्रूधुराचा वापर देखील पोलिसांकडून करण्यात आला. यामध्ये अनेक आंदोलन व पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते. त्यानंतर पुढे हे माती परीक्षणाचे काम अखंडपणे चालू होते. परंतु 5 मे रोजी परत एकदा आंदोलकांनी पोलिसांचे कडे तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलकांना त्यात यश आले नाही. त्यानंतर हे काम सुरळीत सुरू होते. चार ते पाच दिवसानंतर माती परीक्षणाचे काम पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अजूनही मातीच परीक्षणाचा अहवाल येणे बाकी आहे. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेने परत एकदा रिफायनरीचा मुद्दा पेटणार हे मात्र निश्चित.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Barsu Refinery : कोकणातील रिफायनरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; G20 परिषदमुळे पडली वादाची ठिणगी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement