Viral Diseases: कोणाला ताप तर कोणाचं नाक गळतंय! मुंबईतील रुग्णसंख्येत अचानक वाढ, कारण काय?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Viral Diseases: दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशा समस्या असलेल्या रुग्णांची गर्दी वाढत आहे.
मुंबई: सततच्या पावसामुळे आणि वातावरणातील बदलांमुळे मुंबईकरांच्या दवाखान्यातील चकरा वाढल्याचं दिसत आहे. मुंबईत सर्दी आणि फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. खोकला येणे, घसा खवखवणे, छातीमध्ये घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होणे, यांसारख्या लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी मुंबईत मे महिन्यापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कमीजास्त असला तरी वातावरणातील गारवा आणि आर्द्रता सातत्याने टिकून आहे. अशा वातावरणात रोगराई पसरवणाऱ्या विषाणूंची झपाट्याने वाढ आणि प्रसार होतो. परिणामी संसर्ग देखील वाढतो. सध्या मुंबईत लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले लोक हंगामी आजारांना बळी पडत आहेत.
advertisement
सध्या लहानमोठ्या दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशा समस्या असलेल्या रुग्णांची गर्दी वाढत आहे. हे आजार किरकोळ वाटत असले तरी त्यांचा संसर्ग वाढल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. प्रसंगी एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
advertisement
संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. नियमित हात धुणे, स्वच्छता राखणे आणि मास्क वापरणे आवश्यक आहे. यामुळे हवेतील कण आणि विषाणूंशी थेट संपर्क कमी होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घेण्याची आणि वेळेवर लसीकरण करण्याची गरज आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्यांना कोणताही संसर्गजन्य आजार फार लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशांना सावधगिरी बाळगली पाहिजे. अशा नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. संसर्ग झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर औषधे किंवा लसीकरण घेणं गरजेचं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 12:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Viral Diseases: कोणाला ताप तर कोणाचं नाक गळतंय! मुंबईतील रुग्णसंख्येत अचानक वाढ, कारण काय?