टीका झाली-यूटर्न घेण्याची वेळ आली!; अकोट, अंबरनाथनंतर भाजपला तिसरा धक्का, बदलापुरातील आपटेचा राजीनामा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Badlapur Physical Abuse Case Tushar Apte Resigns: सर्वत्र झालेल्या टीकेनंतर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याने स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याने स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत नगरसेवक केल्याने राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला नगरसेवक करणे हेच 'पार्टी विथ डिफरन्स' असल्याचा घणाघात विरोधी पक्षाने केला होता. सगळीकडूनच टीका होत असल्याने तुषार आपटे याने आपल्या स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.
अकोटमध्ये भारतीय जनता पक्षाने एमआयएम पक्षाशी युती केली. त्यानंतर अंबरनाथमध्ये काँग्रेस पक्षाशी जुळवून घेतले. परंतु दोन्ही ठिकाणच्या राजकीय घडामोडी देशपातळीवर चर्चेत आल्याने भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर स्थानिक पातळीवरील निर्णय असल्याचे म्हणत भाजपकडून तोंडदेखल्या कारवाईची घोषणा झाली. परंतु आधीच्या घडामोडींची चर्चा थांबत नाही तोच बदलापुरात लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवकपद दिल्याने भाजपवर पुन्हा यू टर्न घेण्याची पाळी आली.
advertisement
लैंगिक अत्याचार प्रकरणात तुषार आपटे सहआरोपी
बदलापुरातील ज्या शाळेत बालिकेवर लैंगिक अत्याचार झाले, त्याच शाळेचा सचिव तुषार आपटे याच्यावरही लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले. या प्रकरणात आपटे हा सहआरोपी होता. प्रकरण समोर आल्यानंतर आपटे फरार होता. काही दिवसांनंतर तो पोलिसांसमोर हजर झाला. त्यानंतरच्या ४८ तासांत त्याला जामीन मिळाला. लैंगिक अत्याचार प्रकरणातून आपटे अद्याप सुटलेला नसतानाही भाजपने त्याला स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिल्याने रोष व्यक्त होत आहे. हेच ओळखून आपटेने राजीनामा देण्याचे ठरवले.
advertisement
शाळेची बदनामी होऊ नये म्हणून राजीनामा
मी स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देत आहे. शाळेवर कोणत्याही प्रकारची टीका होऊ नये, तसेच शाळेची बदनामी होऊ नये मी राजीनामा देत असल्याचे तुषार आपटे म्हणाला. तसेच भारतीय जनता पक्षावरही टीका सुरू होती. त्यामुळे पक्ष आणि शाळेची बदनामी होऊ नये म्हणून राजीनाम्याचे पाऊल उचलल्याचे तुषार आपटे याने स्पष्ट केले.
advertisement
प्रभागातील चार उमेदवार निवडून आणण्यात तुषार आपटे याचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगण्यात आले. त्याचमुळे भारतीय जनता पक्षाने आपटे याला स्वीकृत नगरसेवकपद दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. परंतु विरोधकांनी घेतलेल्या तीव्र आक्षेपांनंतर आणि झालेल्या टीकेनंतर आपण माघार घेत असल्याचे आपटे म्हणाला.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 3:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
टीका झाली-यूटर्न घेण्याची वेळ आली!; अकोट, अंबरनाथनंतर भाजपला तिसरा धक्का, बदलापुरातील आपटेचा राजीनामा









