पाईपलाईन टाकताना पाटलांच्या शेतात काळाचा घाला; कराडमध्ये दोन मजुरांचा करुण अंत
- Published by:Prachi Amale
Last Updated:
खोदकाम खोलवर झालेले असतानाच वरच्या बाजूचा मातीचा मोठा ढिगारा अचानक खचला आणि थेट या दोन्ही मजुरांच्या अंगावर कोसळला.
विशाल पाटील, प्रतिनिधी
सातारा : कराड तालुक्यातील उंडाळे-मनव मार्गावर असलेल्या संगम शिवारात शनिवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. शेतात पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या चरमध्ये काम करत असताना, अचानक मातीचा प्रचंड ढिगारा अंगावर कोसळल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मनव गावावर शोककळा पसरली असून, ग्रामीण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
दक्षिण मांड नदीच्या शेजारी असलेल्या संगम शिवारात श्रीरंग पाटील यांच्या शेतात पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. शनिवारी दुपारी करण बाजीराव चव्हाण आणि अमर रंगराव वडार (दोघेही रा. मनव, ता. कराड) हे दोन मजूर चरीमध्ये उतरून पाईपलाईनचे काम करत होते. खोदकाम खोलवर झालेले असतानाच वरच्या बाजूचा मातीचा मोठा ढिगारा अचानक खचला आणि थेट या दोन्ही मजुरांच्या अंगावर कोसळला.
advertisement
दोन्ही तरुणांचा मृत्यू
मातीचा ढिगारा इतका मोठा होता की, दोन्ही मजुरांना बाहेर पडण्याची साधी संधीही मिळाली नाही. परिसरात असलेल्या इतर मजुरांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने माती बाजूला काढण्यासाठी धाव घेतली. मात्र, ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने आणि श्वास गुदमरल्याने या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
advertisement
गावावर शोककळा
घटनेची माहिती मिळताच उंडाळे आणि मनव परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. कामावर गेलेले तरुण परतलेच नाहीत, या कल्पनेने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 8:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पाईपलाईन टाकताना पाटलांच्या शेतात काळाचा घाला; कराडमध्ये दोन मजुरांचा करुण अंत









