Uddhav Thackeray : शरद पवारांसाठी उद्धव ठाकरेंची बॅटिंग, पंतप्रधान मोदींच्या टीकेनंतर आकडेवारीच दिली
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदी यांनी शिर्डी दौऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
रत्नागिरी, 27 ऑक्टोबर (सचिन सावंत, प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा मतदारसंघ असलेल्या श्रीवर्धनमध्ये आज महाविकास आघाडीची सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा होत आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हे सर्वजण श्रीवर्धन येथे एकत्र आले आहेत. यानंतर श्रीवर्धन येथे इंडीया आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, या सभेतून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथून शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याला प्रतिउत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
शरद पवारांसाठी ठाकरेंची बॅटींग
अगोदर येथे जमलेल्या पक्षांमध्ये विरोध झाले. तरीपण ते विसरून आम्ही आज एका व्यासपीठावर आलो. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची दोस्ती अजरामर आहे. सध्या सोबत्याला पण संपवायची पद्धत आली आहे. मोदी महाराष्ट्रात आले होते, त्यांनी पवारांवर टीका केली. पवारसाहेब कृषी मंत्री असताना 70 हजार कोटींची कामे शेतकऱ्यांसाठी केली आहेत. सध्या गंगा पृथ्वीवर मीच आणली अशा अविर्भावात लोकं वावरतात. अनेकांनी सांगितली ही इंडियाची मीटिंग आहे. पण ही इंडियाची मीटिंग एवढ्याशा मंडपात होणार नाही. जी मिटींग होईल ती पूर्ण भारतभर होणार आहे. तुम्ही जो सध्या डाव मांडलेला आहे. तो मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचा इशारा ठाकरे यांनी दिला.
advertisement
मागील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शेकाप काहीसा बॅकफूटला गेलेल्या अवस्थेत होता. राज्यात मागील दोन वर्षांत ज्या राजकीय घडामोडी सुरू होत्या त्याबाबतही शेकापचे आमदार जयंत पाटील बुचकळयात पडलेल्या अवस्थेत होते. शेकापनेते सावध पवित्रा घेत होते. काय भूमिका घ्यायची याबाबत शेकापमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र २ ऑगस्ट रोजी पाली येथे झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शेकापने आपली भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडी बरोबर राहणार असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना तटकरेंच्या बालेकिल्ल्यात आणण्याचा घाट आमदार जयंत पाटलांनी घातला आहे.
advertisement
या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडिया आघाडीचे कोकणात प्रथमच शक्तीप्रदर्शन होणार आहे. शेकापसह शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्रितरित्या आपली ताकद दाखवण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणूकीतील शेकापच्या पराभवापासून जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यातून विस्तव जात नाही, अशी परीस्थिती आहे. परंतु जयंत पाटील हे तटकरे यांच्यावर थेट टीका करणे टाळत होते मात्र त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती. आगामी काळात जयंत पाटील हे तटकरे यांच्या विरोधात थेट मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
Location :
Raigad,Maharashtra
First Published :
October 27, 2023 4:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : शरद पवारांसाठी उद्धव ठाकरेंची बॅटिंग, पंतप्रधान मोदींच्या टीकेनंतर आकडेवारीच दिली