चप्पल तुटली, गाडी बंद पडली आणि वर्ध्यात सुरू झाली नवरात्र मंडळाची अनोखी परंपरा, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
वर्धा येथे सराफा लाईन नवरात्र उत्सव मंडळ आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्गा देवी प्रतिष्ठापना आणि विसर्जनाची अनोखी परंपरा ते पाळत आहेत.
वर्धा, 17 ऑक्टोबर: सध्या राज्यात सर्वत्र नवरात्री उत्सवाचा उत्साह आहे. प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येक मंडळामध्ये आपापल्या परंपरा जपत नवरात्रीचा महोत्सव साजरा केला जातो. वर्धा येथील काही दुर्गा मंडळे सजावटी करिता तर काही देखाव्यांकरिता प्रसिद्ध आहेत. तर सराफा व्यावसायिकांच्या सराफा लाईन दुर्गा मंडळानं गेल्या 54 वर्षांपासून एक अनोखी परंपरा जपली आहे. याबाबत मंडळाचे कार्यकर्ते सुरेश नारे यांनी माहिती दिलीय.
काय आहे परंपरा?
वर्धा शहरातील मुख्य बाजारात असलेल्या टिळक चौक सराफा लाईन येथे व्यावसायिकांचं एक दुर्गा मंडळ आहे. गेल्या 54 वर्षांपासून या ठिकाणी नवरात्री उत्सवात दुर्गा पूजा केली जाते. मूर्ती प्रतिष्ठापना आणि विसर्जनावेळी एक अनोखी परंपरा या ठिकाणी सुरू आहे. मूर्तिकाराच्या घरापासून ते मंडपापर्यंत देवीला रथामधून आणले जाते. विशेष म्हणजे देवीचा रथ दोराने ओढत मिरवणुकीने हे होत असतं. तेव्हा मोठ्या संख्येने भक्त या मिरवणुकीत सहभागी होतात.
advertisement
चप्पल तुटली, गाडीही पडली बंद
देवीचा रथ ओढून नेण्याची परंपरा कशी सुरू झाली याबाबत नारे सांगतात की, "बऱ्याच वर्षांपूर्वी असं झालेलं की, देवीची मिरवणूक निघत असताना आमच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याची चप्पल तुटली. ती त्यांना नाईलाजाने तिथेच टाकून द्यावी लागली. नेमकं तेव्हाच देवीची मूर्ती ज्या रथात ठेवली होती ती गाडीही बंद पडली. काही केल्या ती गाडी सुरूच होईना. तेव्हा कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण सगळे मिळून देवीची विसर्जन मिरवणूक ही नदीपर्यंत दोराने ओढत काढायची. त्यावर्षी देवीच्या मूर्तीला साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला. तेव्हापासून मंडळ कार्यकर्त्यांनी ठरवलं की दरवर्षी देवीची आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक ही आपण आपल्या श्रमाने ओढत काढायची आणि तेव्हापासून ही परंपरा आजही सुरू आहे."
advertisement
मूर्तिकारही एकच
सुरवातीला वर्धा येथील मूकबधिर असलेले मूर्तिकार यांच्याकडून मूर्ती विकत आणली गेली होती. त्याच्या दुसऱ्या वर्षी मूर्तीच्या दरावरून मंडळातील काही तरुण कार्यकर्ते आणि मूर्तिकारांमध्ये शाब्दिक मतभेद आणि छोटा वाद झाला. त्यामुळे दुसऱ्या वर्षी दुसऱ्या मूर्तीकरांकडून मूर्ती बनवून घेतली. मात्र ती मूर्ती अनेकांना उचलता येत नव्हती इतकी वजनी होती. घरी आणताना काही मंडळ कार्यकर्त्यांना काही ना काही छोट्या दुखापती झाल्या. त्यामुळे मंडळ कार्यकर्त्यांनी ठरवलं की दरवर्षी जुन्याच मूर्तीकारांकडून मूर्ती बनवून घ्यायची. तेव्हापासून मूर्तिकारही मूर्तीच्या दराला घेऊन वाद निर्माण करत नाहीत आणि मंडळ कार्यकर्ते देखील मोठ्या आनंदाने त्यांच्याकडूनच मूर्ती खरेदी करतात. तेव्हापासून आजपर्यंत मूकबधिर असलेले वर्ध्यातील प्रसिद्ध मूर्तिकार हनुमंत बोरसरे यांच्याकडूनच मूर्ती खरेदी होते, असं नारे यांनी सांगितलं.
advertisement
दरवर्षी होतात सामाजिक उपक्रम
दरवर्षी नवरात्रीतील नऊ दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नेत्ररोग निदान तसेच शस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान शिबिर, रोज भव्य लंगर, पुस्तक प्रकाशन तसेच वितरण, अशाप्रकारे अनेक भाविकांनाही या शिबिरांचा आणि महाप्रसादाचा लाभ मिळतो. इतकंच नाही तर नैसर्गिक आपत्तीग्रस्त झालेल्या ठिकाणी या मंडळाच्या वतीने शक्य तितकी मदतही दिली जाते. डोळ्यांच्या शस्त्रक्रिये करिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुरस्कारही दिला गेला आहे. दरवर्षी प्रशासकीय अधिकारी देखील देवीच्या दर्शनाला येत असून दररोज आरतीला परिसरातील शेकडो भाविकांची उपस्थिती असते.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 17, 2023 10:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
चप्पल तुटली, गाडी बंद पडली आणि वर्ध्यात सुरू झाली नवरात्र मंडळाची अनोखी परंपरा, Video