Harsul Lake: सप्टेंबर उजाडला तरी हर्सूल तलाव भरेना, छ. संभाजीनगरकरांचे उर्वरित नक्षत्रांकडे लागले डोळे
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Harsul Lake: सोमवारी (1 सप्टेंबर) संध्याकाळपर्यंत तलावाची पाणीपातळी 22 फूटापर्यंत पोहोचली होती.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जून आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पण, संभाजीनगर शहरातील हर्सूल तलाव अजून पूर्णपणे भरलेला नाही. या तलावातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. सप्टेंबर महिना सुरू झाला तरी तलाव पूर्णपणे न भरल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाळा संपूपर्यंत तलाव पूर्णपणे भरला नाही तर भविष्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
सोमवारी (1 सप्टेंबर) संध्याकाळपर्यंत तलावाची पाणीपातळी 22 फूटापर्यंत पोहोचली होती. तलाव भरण्यासाठी 28 फूट पाणीपातळी लागते. दररोज तलावातून दहा एमएलडी पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यात हर्सूल तलावाचा मोठा वाटा आहे. मागील अनेक वर्षांपासून तलावातून दररोज 10 एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतो. जवळपास 16 पेक्षा अधिक वॉर्डाची तहान या पाण्याने भागते. दररोज कमाल 15 एमएलडी पाण्याचा उपसा करून ते नागरिकांना पुरवण्याची सोय या ठिकाणी आहे.
advertisement
मागील वर्षी तलाव तुटुंब भरला होता. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईचा फारसा त्रास झाला नव्हता. यंदाही तलाव भरेल अशी अपेक्षा होती. मात्र, सप्टेंबर महिना सुरू झाला तरी तलावात अपेक्षेप्रमाणे पाणी आललं नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळपर्यंत तलावाची पाणीपातळी 22 फूट होती. तलावाची पाणी धारण क्षमता 28 फूट आहे. त्यापेक्षा जास्त पाण्याची आवक झाली तर सांडव्यावरून पाणी आपोआप खाम नदीत वाहून जाते.
advertisement
सध्या जायकवाडीवर भागते शहराची तहान
सध्या शहराला अतिरिक्त 26 एमएलडी पाणी मिळत आहे. जुन्या आणि नवीन जलवाहिन्यांमधून दररोज 171 एमएलडी पाणी मिळत असल्याने विविध वसाहतींना पूर्वीच्या तुलनेत एक दिवस अगोदर पाणी मिळत आहे. डिसेंबरपर्यंत नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहराला दररोज 200 एमएलडी पाणी आणावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. जायकवाडीचं अतिरिक्त पाणी शहराला मिळालं तर हर्सूल तलावातील पाण्याची शहराला गरज पडणार नाही.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Sep 02, 2025 10:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Harsul Lake: सप्टेंबर उजाडला तरी हर्सूल तलाव भरेना, छ. संभाजीनगरकरांचे उर्वरित नक्षत्रांकडे लागले डोळे







