Belapur: एक चुकीचा टर्न अन् आयुष्याचा शेवट! बेलापूरमधील ही जागा का ठरतेय जीवघेणी?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Belapur Jetty: बेलापूर येथील जेट्टीवरून एक दुचाकी खाली कोसळून तरुणाचा अपघात झाला.
नवी मुंबई: बेलापूर येथील जेट्टीवरून दुचाकी खाली कोसळून अपघात घडल्याची घटना शनिवारी (27 सप्टेंबर) पहाटे घडली. याच ठिकाणी जुलै महिन्यात एक कार खाडीत कोसळली होती. त्यावेळी कारचा मागचा दरवाजा वेळीच उघडल्याने चालक महिलेचा थोडक्यात जीव वाचला होता. या अपघातांना तेथील एक शॉर्टकट कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर सेक्टर 15 कडून उळवेकडे जाणाऱ्या पुलावर जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता वापरला जात आहे. या मार्गाने पुलावर जाण्यापूर्वीच जेट्टीकडे जाणारा एक काँक्रीटचा रस्ता आहे. अनेक वाहनचालक याच काँक्रीटच्या रस्त्याला मुख्य मार्ग समजत आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचं काँक्रिटीकरण झालं आहे. जेट्टीकडे जाणाऱ्या या मार्गाला जोडूनच सीबीडी सेक्टर 15 येथून एक शॉर्टकट तयार झालेला आहे. त्याचा वापर करून सेक्टर 15 परिसरातील वाहनं उळवेच्या पुलावर जातात.
advertisement
पहिल्यांदाच या शॉर्टकटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना समोर जेट्टीकडे जाणारा काँक्रीटचा रस्ता दिसतो. त्यालाच उळवेकडे जाणारा मार्ग समजून राँग टर्न घेऊन वाहन पळवल्यास गाडी थेट जेट्टीवरून खाडीत कोसळते. गेल्या काही महिन्यांत घडलेले अपघात अशाच पद्धतीने घडले आहेत. शनिवारी घडलेल्या दुर्घटनेनंतर जेट्टीपासून अलीकडे पोलिसांनी बॅरिकेडस लावून रस्ता बंद केला आहे.
advertisement
सहायक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, उळवेचा रस्ता आणि जेट्टीचा रस्ता समांतर असल्याने वाहनं जेट्टीकडे येतात. अशाच प्रकारातून शनिवारची दुर्घटना घडली आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी जेट्टीजवळ बॅरिकेड्स लावले आहेत. त्याशिवाय खासगी वाहने जेट्टीकडे येणार नाहीत, यासाठी मार्गाच्या सुरुवातीलाच रस्ता बंद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
September 30, 2025 10:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Belapur: एक चुकीचा टर्न अन् आयुष्याचा शेवट! बेलापूरमधील ही जागा का ठरतेय जीवघेणी?