सोयाबीनला पांढऱ्या माशीचा धोका, पिवळा विषाणू दिसताच गाढून टाका! कृषीतज्ज्ञांचा सल्ला
- Published by:News18 Marathi
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून सततच्या ढगाळ हवामानामुळे सोयाबीनवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येतेय. त्यामुळे हातचे पीक वाया जावू नये म्हणून शेतकऱ्यांनी वेळीच उपाय करण्याची गरज आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव: मराठवाड्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती केली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सततच्या ढगाळ हवामानामुळे सोयाबीनवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येतेय. त्यामुळे हातचे पीक वाया जावू नये म्हणून शेतकऱ्यांनी वेळीच उपाय करण्याची गरज आहे. धाराशिवमधील सोयाबीन पिकाला यलो मोझॅक म्हणजेच पिवळ्या विषाणूचा धोका वाढला आहे. यावर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? याबाबत कृषीतज्ज्ञ विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिलीय.
advertisement
पिवळ्या विषाणूचा धोका
सध्या सोयाबीनचे पीक खोलोरा अवस्थेत आहे. सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून येतोय. या रोगाची वाहक पांढरी माशी आहे. यामध्ये झाडांची पाने व शिरा पिवळ्या पडतात. पानांचा काही भाग हिरवळ तर काही भाग पिवळसर दिसून येतो. तर शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात.
advertisement
काय काळजी घ्यावी?
येलो मोझॅक पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाने होतो. याची वाढ अत्यंत झपाट्याने होते. त्यामुळे याच्यासाठी शेतातील रोगग्रस्त झाडे उपटून काढावीत. तसेच ती समुळ नष्ट करावीत किंवा जमिनीत गाढून टाकावीत, असे कृषीतज्ज्ञ सूर्यवंशी यांनी सांगितले.
कृषी विभागाचा सल्ला
सोयाबीन पिकात शिफारशी पेक्षा जास्त नत्राचा वापर टाळावा. रोगवाहक पांढरी माशी मावा व किडींच्या नियंत्रणासाठी थायमेथॉक्सम 25 टक्के डब्ल्यू जी, दोन मिलि प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, यंदा सोयाबीन पिकावर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाचा सल्ला घेणेदेखील गरजेचं आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 09, 2024 12:01 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीनला पांढऱ्या माशीचा धोका, पिवळा विषाणू दिसताच गाढून टाका! कृषीतज्ज्ञांचा सल्ला