Bank Account : तुमच्याकडे किती बँक अकाउंट्स असावेत? जास्त बँक अकाउंट्स ठेवणं फायद्याचं की नुकसानदायक तज्ज्ञ काय सांगतात? वाचा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जास्त खाती असणं ही श्रीमंतीची लक्षणं नाही तर ते तुमच्या आर्थिक नियोजनातील गोंधळाचं कारण ठरू शकतं. मग नक्की किती बँक खाती असावीत? आणि जास्त खाती असण्याचे तोटे काय? हे आज आपण या लेखात सविस्तर समजून घेणार आहोत.
मुंबई : आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत एक गोष्ट हमखास घडते पहिली नोकरी लागली की एक सॅलरी अकाऊंट उघडलं जातं. नोकरी बदलली की दुसरं नवीन खातं येतं. मग लग्नानंतर जोडीदारासोबत एक जॉइंट अकाऊंट, कधी कॅशबॅकच्या ऑफरसाठी एखादं डिजिटल बँक अकाऊंट, तर कधी जास्तीच्या व्याजासाठी तिसरंच खातं बघता बघता काही वर्षांत आपल्याकडे बँकचे 4-5 अकाउंट सहज उघडले जातात.
सुरुवातीला हे सर्व गरजेचं वाटतं, पण कालांतराने या सर्व खात्यांमधील मिनिमम बॅलन्स सांभाळणं, त्यांचे पिन लक्षात ठेवणं आणि विनाकारण लागणारे चार्जेस भरणं ही एक डोकेदुखी बनून जाते. जास्त खाती असणं ही श्रीमंतीची लक्षणं नसून, ते तुमच्या आर्थिक नियोजनातील गोंधळाचं कारण ठरू शकतं. मग नक्की किती बँक खाती असावीत? आणि जास्त खाती असण्याचे तोटे काय? हे आज आपण या लेखात सविस्तर समजून घेणार आहोत.
advertisement
प्रायमरी अकाऊंट : तुमच्या आर्थिक व्यवहाराचा केंद्रबिंदू
प्रत्येकाकडे एक असं मुख्य खातं असावं, जिथे तुमचा पगार किंवा उत्पन्न जमा होतं. तुमचे सर्व महत्त्वाचे खर्च जसे की घराचे भाडे, EMI, विम्याचे हप्ते आणि इतर सबस्क्रिप्शन याच एका खात्यातून जोडलेले असावेत.
फायदा: जेव्हा पैसा एकाच ठिकाणाहून येतो आणि जातो, तेव्हा खर्चाचा मागोवा घेणं अत्यंत सोपं होतं.
advertisement
दुसरं खातं: बचतीचा सुरक्षित कोपरा
अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते, बचतीसाठी किंवा आपत्कालीन निधीसाठी (Emergency Fund) एक स्वतंत्र खातं असणं फायद्याचं ठरतं.
फायदा: रोजच्या खर्चाच्या खात्यापासून हे खातं वेगळं असल्यामुळे, भविष्यासाठी साठवलेले पैसे खर्च करण्याचा मोह होत नाही. तसेच, कौटुंबिक खर्चासाठी पती-पत्नी मिळून एक वेगळं जॉइंट अकाऊंट देखील ठेवू शकतात.
या सगळ्यासाठी दोन खाते पुरेसे आहेत, पण एखादं आणखी खातं तुम्ही उघडू शकता, पण तीनपेक्षा जास्त खाती का नकोत? जर तुमच्याकडे तीनपेक्षा जास्त बँक खाती असतील, तर तुम्ही नकळत स्वतःचं नुकसान करत आहात.
advertisement
कारण प्रत्येक बँकेचे मिनिमम बॅलन्सचे नियम वेगळे असतात. केवळ दंड टाळण्यासाठी एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे फिरवण्यातच तुमची खूप ऊर्जा खर्च होते.
सेव्हिंग अकाऊंटवर मिळणारं व्याज खूप कमी असतं. अनेक खात्यांमध्ये थोडे-थोडे पैसे ठेवण्याऐवजी, ते एकत्र करून त्यांची 'फिक्स्ड डिपॉझिट' (FD) केल्यास तुम्हाला जास्त परतावा मिळू शकतो.
डेबिट कार्ड चार्जेस, एसएमएस चार्जेस आणि इतर वार्षिक शुल्क प्रत्येक खात्यासाठी वेगळे द्यावे लागतात. ५ खाती म्हणजे वर्षाला 5 हजार रुपये तरी विनाकारण खर्च होतात.
advertisement
नेमकी किती खाती असावीत? थंब रूल काय सांगतो?
पगारदार व्यक्तींसाठी 2 ते 3 बँक खाती पुरेशी आहेत.
मुख्य खाते: उत्पन्न आणि नियमित खर्चासाठी.
बचत खाते: इमर्जन्सी फंड आणि बचतीसाठी.
ऐच्छिक खाते: जॉइंट अकाऊंट किंवा विशिष्ट गुंतवणुकीसाठी (उदा. होम लोन लिंक अकाऊंट).
काही महत्त्वाच्या शंका आणि त्यांची उत्तरं
एकाच बँकेत सर्व पैसे ठेवणं धोकादायक आहे का?
जर तुमची रक्कम खूप मोठी असेल, तर सुरक्षेसाठी ती दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागून ठेवणे चांगले. पण दैनंदिन व्यवहारासाठी एकच बँक सोयीची ठरते.
advertisement
जास्त खाती असल्यास क्रेडिट स्कोअर सुधारतो का?
नाही! सिबिल स्कोअर (CIBIL Score) हा तुमच्या कर्जाच्या परतफेडीवर अवलंबून असतो, बँक खात्यांच्या संख्येवर नाही.
जुने सॅलरी अकाऊंट बंद करावे का?
हो! जर तुम्ही नोकरी बदलली असेल आणि जुन्या खात्याचा काहीही वापर नसेल, तर ते बंद करणंच शहाणपणाचं आहे. अन्यथा, बॅलन्स नसल्यास बँक तुमच्याकडून दंड वसूल करू शकते.
advertisement
बँकिंग व्यवहार सुटसुटीत असणं म्हणजे केवळ आर्थिक बचत नाही, तर ती मानसिक शांतताही आहे. वर्षातून एकदा आपल्या सर्व बँक खात्यांचा आढावा घ्या. जी खाती विनाकारण पडून आहेत, ती बंद करा. लक्षात ठेवा, बँकिंग हे तुमच्या सोयीसाठी आहे, तुमच्या अडचणी वाढवण्यासाठी नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 8:31 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Bank Account : तुमच्याकडे किती बँक अकाउंट्स असावेत? जास्त बँक अकाउंट्स ठेवणं फायद्याचं की नुकसानदायक तज्ज्ञ काय सांगतात? वाचा










