'UPI नाही, फक्त रोख पैसे'; या पोस्टर मागे खळबळजनक गणित, बाजारात चालतोय गुप्त QR कोड
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
UPI to Cash: बेंगळुरू आणि दिल्लीसारख्या महानगरांतील अनेक लहान व्यापाऱ्यांनी UPI पेमेंटऐवजी पुन्हा रोख व्यवहार स्वीकारायला सुरुवात केली आहे. जीएसटी नोटिसा, अफवा आणि व्यवहारात अडथळा यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई: या वर्षाच्या सुरुवातीला एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधले होते. ती बातमी म्हणजे तामिळनाडूमधील एका पाणीपुरी विक्रेत्याला जीएसटी विभागाने 40 लाखांच्या उलाढालीसाठी नोटीस पाठवली होती. यामागील कारण म्हणजे त्याने यूपीआयद्वारे पैसे स्वीकारले आणि त्यामुळे त्याची कमाई थेट कर विभागाच्या रडारवर आली. ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
आता देशाची आयटी राजधानी समजल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्येही यूपीआय व्यवहारांबाबत अडचणी सुरू झाल्या आहेत. शहरातील अनेक दुकानांवर आधी दिसणारे QR कोड स्टिकर्स आता गायब झाले आहेत. त्यांच्या जागी प्रिंटआऊट किंवा हाताने लिहिलेले पोस्टर लागले आहेत ज्यावर लिहिले आहे – ‘UPI नाही, फक्त रोखच’.
अचानक अशी स्थिती का?
बेंगळुरू नेहमीच डिजिटल पेमेंटच्या बाबतीत आघाडीवर राहिले आहे. पण अलीकडे अनेक छोटे दुकानदार यूपीआयऐवजी रोख रक्कम स्वीकारत आहेत. काही विक्रेत्यांनी सांगितले की त्यांनी UPI वापरणे कमी केले असून काहींनी तर पेमेंट अॅप्सचा वापर पूर्णपणे थांबवला आहे. यामागील कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत हजारो छोटे व्यापारी – विशेषतः स्ट्रीट फूड विक्रेते – यांना जीएसटी विभागाकडून नोटिसा मिळाल्या आहेत. काही नोटिसा तर लाखोंच्या रकमेच्या आहेत.
advertisement
GST अधिकाऱ्यांकडून त्रास
बेंगळुरू स्ट्रीट वेंडर्स असोसिएशनचे संयुक्त सचिव अॅड. विनय के. श्रीनिवास यांनी सांगितले की अनेक दुकानदारांना GST अधिकारी सतावत आहेत. त्यामुळेच ते UPIऐवजी कॅश पसंत करत आहेत. दरम्यान आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात या राज्य सरकारांनी UPI अॅप्स आणि पेमेंट कंपन्यांकडून छोट्या विक्रेत्यांचा वार्षिक टर्नओव्हरचा डेटा मागितल्याचीही बातमी समोर आली आहे.
advertisement
दिल्ली देखील तोच प्रकार
ही गोष्ट फक्त बेंगळुरूची नाही तर देशाची राजधानी नवी दिल्ली देखील हाच प्रकार असल्याचे दिसून आले. दिल्लीतील किरकोळ विक्रेते तसेच रिक्षावाले UPI ऐवजी रोख रक्कम स्विकारत आहेत.
फसव्या अफवांचा परिणाम
काही विक्रेत्यांनी UPI न वापरण्यामागे एक अफवा कारणीभूत असल्याचे सांगितले – की सरकार दोन हजार रुपयांपेक्षा जास्तच्या यूपीआय व्यवहारांवर कर लावणार आहे. ही अफवा चुकीची ठरली, पण त्याचा परिणाम अजूनही दिसतो आहे. एक विक्रेता म्हणाला, ही अफवा पसरल्यानंतर ग्राहकांनी कॅशमध्ये व्यवहार सुरू केले. त्यामुळे आम्हीही कॅशच घेतो.
advertisement
गुप्त QR कोड
काही दुकानदार असेही आहेत जे पहिल्यांदा UPI नाकारतात. पण ग्राहकांकडे कॅश नसेल तर लपवून ठेवलेला QR कोड बाहेर काढतात. एक विक्रेता म्हणाला, हा QR कोड माझ्या मोबाईलचा नाही. माझ्या बायकोच्या मोबाईलचा आहे. गरज पडली तरच मी वापरतो. अन्य एक दुकानदार म्हणाला, कंपनी वेळेवर पैसे देत नाही. मोबाईलमधून पैसे येतात पण लगेचच उपयोगात येत नाहीत. कॅश मात्र लगेच कामी येते.
advertisement
फक्त कर नव्हे, तर...
चार्टर्ड अकाउंटंट अतुल गुप्ता यांनी सांगितले की- केवळ करच नव्हे, तर अनेक कारणांमुळे छोटे व्यापारी यूपीआय टाळतात. उदा. UPI व्यवहारांचे पैसे लगेच खात्यात जमा होत नाहीत – यासाठी काही वेळ लागतो. जर छोट्या विक्रेत्याची बरीचशी कमाई 10 दिवसांसाठी अडकली, तर त्याचे व्यवहार थांबू शकतात.
दुसरे म्हणजे प्रोसेसिंग फी – जी काही कंपन्या घेतात, त्यामुळे पूर्ण पैसे विक्रेत्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जेव्हा ही फी जास्त वाटते. तेव्हा विक्रेते UPI टाळू लागतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 20, 2025 6:49 PM IST
मराठी बातम्या/मनी/
'UPI नाही, फक्त रोख पैसे'; या पोस्टर मागे खळबळजनक गणित, बाजारात चालतोय गुप्त QR कोड







