रेल्वेचा प्रवाशांना झटका, सरकारने पुन्हा वाढवले भाडे; या तारखेपासून होणार तिकीट महाग, मेल-एक्सप्रेसच्या प्रवास दरात मोठी वाढ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Railway Fare Hike: नव्या वर्षाआधीच रेल्वे प्रवाशांना मोठा आर्थिक धक्का बसला असून 26 डिसेंबरपासून एसी तसेच मेल-एक्सप्रेस नॉन-एसी तिकिटांचे दर वाढवण्यात आले आहेत. प्रति किलोमीटर भाडेवाढीच्या या निर्णयामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने भाडेवाढीचा निर्णय घेतल्याने एसी डब्यांमधून प्रवास करणारे प्रवासी तसेच मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधील नॉन-एसी प्रवाशांना 26 डिसेंबरपासून तिकीटासाठी जास्त भाडे मोजावे लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या प्रवासी वर्गासाठी प्रति किलोमीटर 2 पैसे इतकी भाडेवाढ जाहीर केली आहे. या वाढीमुळे नॉन-एसी डब्यातून 500 किलोमीटर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला सुमारे 10 रुपये अतिरिक्त भाडे द्यावे लागेल.
advertisement
चालू आर्थिक वर्षातील ही रेल्वेची दुसरी भाडेवाढ आहे. यापूर्वी जुलै महिन्यात भाड्यात सुधारणा करण्यात आली होती. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की सध्याच्या भाडे समायोजन प्रक्रियेत उपनगरीय रेल्वे सेवा आणि मासिक सीझन तिकिटे (MST) यांच्यावर कोणतीही भाडेवाढ लागू करण्यात आलेली नाही. उपनगरीय प्रवासी आणि एमएसटी धारक हे रेल्वे प्रवाशांचा सर्वात मोठा वर्ग असल्याने त्यांना दिलासा देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
तसेच साध्या (ऑर्डिनरी) वर्गातून 215 किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही कोणतीही भाडेवाढ लागू होणार नाही. अल्प अंतराचे प्रवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवरील अतिरिक्त भार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र 215 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी साध्या वर्गातील भाड्यात प्रति किलोमीटर 1 पैशांची वाढ करण्यात आली आहे.
advertisement
मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमधील नॉन-एसी वर्गासाठी भाडेवाढ प्रति किलोमीटर 2 पैसे इतकी आहे; तर एसी वर्गातील प्रवाशांनाही प्रति किलोमीटर 2 पैशांचीच मर्यादित वाढ सहन करावी लागणार आहे. या भाडे समायोजनामुळे चालू आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेला सुमारे 600 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या दहा वर्षांत भारतीय रेल्वेच्या नेटवर्क आणि कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. अधिक गाड्या, वाढलेला वेग आणि सुरक्षेवर दिलेला विशेष भर यामुळे मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी,मनुष्यबळावरील खर्च सुमारे 1.15 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, पेन्शनवरील दायित्वही सुमारे 60 हजार कोटी रुपये इतके झाले आहे. 2024–25 या आर्थिक वर्षात रेल्वेच्या एकूण कार्यकारी खर्चाचा आकडा 2.63 लाख कोटी रुपयांवर गेला आहे.
advertisement
या वाढत्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी भारतीय रेल्वे मालवाहतुकीत वाढ करण्यावर भर देत आहे, तसेच प्रवासी भाड्यात मर्यादित स्वरूपाची सुधारणा करत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 3:03 PM IST
मराठी बातम्या/मनी/
रेल्वेचा प्रवाशांना झटका, सरकारने पुन्हा वाढवले भाडे; या तारखेपासून होणार तिकीट महाग, मेल-एक्सप्रेसच्या प्रवास दरात मोठी वाढ










