आगीत सगळं जळून खाक झालं, तरी हरला नाही कल्पेश, आता जोमाने सुरू आहे व्यवसाय
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
साध्या पुदीना सोड्यापासून सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय आज शंभरहून अधिक प्रकारच्या पुदीना सोड्यांसाठी प्रसिद्ध झाला आहे.
मुंबई : मुंबईतील चिंचपोकळी परिसरात चिंचपोकळीचा सोडेवाला म्हणून ओळखले जाणारे कल्पेश लाड यांनी स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर उभा केलेला जस्ट कूल सोडा पब हा व्यवसाय आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. साध्या पुदीना सोड्यापासून सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय आज शंभरहून अधिक प्रकारच्या पुदीना सोड्यांसाठी प्रसिद्ध झाला आहे.
कल्पेश यांनी सुमारे पाच वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. मात्र नोकरी करत असताना त्यांना नेहमीच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. शेवटी धाडस करून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःच्या कल्पनेतून जस्ट कूल सोडा पब सुरू केला. सुरुवातीला हा प्रवास सोपा नव्हता. ग्राहक मिळवणे, वेगवेगळे फ्लेवर तयार करणे आणि व्यवसाय उभा करणे या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली.
advertisement
कल्पेश यांच्या सोडा पबची खासियत म्हणजे पुदीना सोड्याचे विविध प्रयोग. ते तब्बल 100 प्रकारचे पुदीना सोडे तयार करतात. त्यांच्या सोड्यांची किंमतही सर्वसामान्यांना परवडणारी आहे, फक्त 10 रुपयांपासून सुरू होणारी ही किंमत 45 ते 50 रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे परिसरातील तरुण, कुटुंबे आणि सोड्याचे शौकीन ग्राहक मोठ्या प्रमाणात येथे येतात.
advertisement
मात्र या प्रवासात एक मोठे संकटही आले. एका अपघातात कल्पेश यांच्या संपूर्ण घराला आग लागली. या आगीत त्यांचा सर्व माल, फ्लेवर्स आणि सोडा बनवण्याच्या मशीन जळून खाक झाल्या. एका क्षणात त्यांचा सर्व व्यवसाय थांबला. कोणासाठीही हा प्रसंग खूप कठीण असतो, पण कल्पेश खचून बसले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा धैर्याने उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि नव्याने सुरुवात केली.
advertisement
आज या व्यवसायाला सुमारे 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे आणि सातत्यामुळे ते संपूर्ण चिंचपोकळी परिसरात चिंचपोकळीचा सोडेवाला म्हणून ओळखले जातात. या प्रवासात त्यांच्या कुटुंबाने, मित्रपरिवाराने आणि ग्राहकांनी दिलेली साथ त्यांच्यासाठी मोठी ताकद ठरली.
जिद्द, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते, हे कल्पेश लाड यांच्या प्रेरणादायी प्रवासातून स्पष्ट होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 6:08 PM IST






