Women's Day 2026: लग्नानंतर घराबाहेर काढलं, पतीचेही निधन, प्रीतिका खचल्या नाही, उभा केला 5 कोटींचा व्यवसाय, Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मेहनत, जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर उभा केलेला व्यवसाय आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अवघ्या 5000 रुपयांपासून सुरू झालेला त्यांचा छोटासा व्यवसाय आज तब्बल 5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
मुंबई : मुंबईतील दादर परिसरात राहणाऱ्या प्रीतिका सिंग यांनी मेहनत, जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर उभा केलेला व्यवसाय आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अवघ्या 5000 रुपयांपासून सुरू झालेला त्यांचा छोटासा व्यवसाय आज तब्बल 5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
प्रीतिका सिंग यांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. लहान वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे लहानपणापासूनच आयुष्यातील अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. मात्र कठीण परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. शिक्षणासोबत आयुष्याची जबाबदारीही त्यांनी धैर्याने पेलली.
लग्नानंतरही त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. बाळाचाजन्म झाल्यानंतर सासरकडून त्यांना घराबाहेर काढण्यात आले. हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ होता. मात्र त्या खचल्या नाहीत. त्यांनी आणि त्यांच्या पतीने स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा निर्धार केला.
advertisement
याच काळात त्यांचे हितचिंतक माने साहेब यांनी त्यांना 5000 रुपयांची मदत केली. त्या छोट्याशा मदतीचे मोठ्या संधीमध्ये रूपांतर करत प्रीतिका यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला अवघ्या 100 स्क्वेअर फूट जागेत त्यांनी छोट्या प्रमाणात कपड्यांचे दुकान सुरू केले. मेहनत, चिकाटी आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे त्यांचा व्यवसाय हळूहळू वाढत गेला. आज त्याच व्यवसायाने मोठी झेप घेतली आहे. 100 स्क्वेअर फुटांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 1250 स्क्वेअर फुटांपर्यंत पोहोचला असून त्यांनी एक नव्हे तर दोन दुकाने उभी केली आहेत. त्यांच्या दुकानाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
मात्र आयुष्याच्या प्रवासात संकटेही आली. 2024 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. हा त्यांच्या आयुष्यातील आणखी एक मोठा धक्का होता. तरीही या दुःखातून सावरत त्यांनी पुन्हा स्वतःला उभे केले आणि व्यवसाय अधिक जोमाने पुढे नेला.
या संपूर्ण प्रवासात त्यांच्या आईने त्यांना खूप मोठी साथ दिली. प्रीतिका सिंग म्हणतात, प्रत्येक महिलेनं स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले पाहिजे. मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर यश नक्की मिळते.
advertisement
आज त्यांच्या रुही कलेक्शन या दुकानात लखनवी कुर्त्यांचा आकर्षक संग्रह उपलब्ध आहे. हे कुर्ते थेट लखनऊहून मागवले जातात आणि ग्राहकांसाठी 8XL पर्यंत विविध साईझमध्ये उपलब्ध आहेत. प्रीतिका सिंग यांची ही यशोगाथा आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 6:03 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Women's Day 2026: लग्नानंतर घराबाहेर काढलं, पतीचेही निधन, प्रीतिका खचल्या नाही, उभा केला 5 कोटींचा व्यवसाय, Video







