एक कोटी रुपये मिळवण्यासाठी SIP मध्ये प्रत्येक महिन्याला किती रुपयांची गुंतवणूक करावी?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
20 वर्षांत एक कोटी रुपयांचा फंड तयार करण्यासाठी किती रुपयांची एसआयपी करावी लागेल, याबाबतची अधिक माहिती वाचा..
गुंतवणूक ही काळाची गरज ठरत आहे. कारण, वाढती महागाई आणि खर्च बघता जास्तीत जास्त पैशांची गरज भासत आहे. आर्थिक गुंतवणुक करण्यासाठी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हा पर्याय लोकांच्या पसंतीस उतरत आहे. दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून एसआयपी हे एक चांगले साधन आहे. भरपूर संपत्ती निर्माण करण्यात आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात एसआयपी मदत करू शकते. एएमएफआयच्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड एसआयपीने गुंतवणूकदारांना दीर्घकाळापासून भरघोस परतावा दिला आहे. शेअर मार्केटमध्ये भरपूर जोखीम असली तरी देशातील सामान्य लोक आता मोठ्या प्रमाणावर एसआयपीमध्ये गुंतवणूक करत आहेत. 20 वर्षांत एक कोटी रुपयांचा फंड तयार करण्यासाठी किती रुपयांची एसआयपी करावी लागेल, याबाबतची अधिक माहिती वाचा..
जर तुम्हाला दरवर्षी अंदाजे 12 टक्के परतावा मिळत असेल तर 11 हजार रुपयांची एसआयपी करून तुम्ही 20 वर्षांत 1.09 कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता. जर तुम्हाला दरवर्षी अंदाजे 15 टक्के परतावा मिळत असेल तर सात हजार रुपयांची एसआयपी करून 20 वर्षांत 1.06 कोटी रुपयांचा फंड जमा होऊ शकतो.
'या' घटकांवर अवलंबून असतो परतावा
गुंतवणुकीचा कालावधी, अपेक्षित फंड, गुंतवणूक रक्कम आणि परताव्याची टक्केवारी या चार गोष्टींवर एसआयपीमधून मिळणारा परतावा अवलंबून असतो. पहिल्या तीन गोष्टींची अंमलबजावणी करणं गुंतवणूकदारांच्या हातात असतात. पण, मिळणाऱ्या परताव्याची टक्केवारी ही कोणाच्याही हातात नसते. एसआयपीमध्ये मिळणारा परतावा पूर्णपणे शेअर मार्केटमधील घडामोडींवर अवलंबून असतो. पण, तुम्ही जितक्या जास्त कालावधीसाठी एसआयपी कराल तितका तुम्हाला कंपाउंडिंगचा फायदा मिळेल.
advertisement
एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की, एसआयपीतून कधीही एकसमान परतावा मिळत नाही. त्यात सतत चढ-उतार होत असतात. म्हणून, आपल्या क्षमतेनुसार शक्य तितके जास्त पैसे एसआयपीमध्ये गुंतवले पाहिजेत.
रेग्युलर एसआयपी, स्टेप-अप एसआयपी, फ्लेक्सिबल एसआयपी असे एसयआपीचे प्रकार आहेत. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही स्वत:साठी योग्य एसआयपी निवडू शकता. मात्र, सर्व बचत म्युच्युअल फंडात गुंतवणं योग्य नाही, असं आर्थिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तुम्ही काही पैसे सोनं, कर्ज, मालमत्ता इत्यादींमध्येही गुंतवू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2024 10:22 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
एक कोटी रुपये मिळवण्यासाठी SIP मध्ये प्रत्येक महिन्याला किती रुपयांची गुंतवणूक करावी?