ज्याची भीती अखेर तेच घडलं, अमेरिकेनं लावला 26 टक्के कर, भारतात महागाई वाढणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीन आणि अन्य व्यापार भागीदारांवर आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. भारताच्या निर्यात उद्योगांवर 26% अतिरिक्त टेरिफ लागू होणार आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची भीती इतके दिवस होती तेच झालं. याचा परिणाम जागतिक आणि भारतीय शेअर मार्केटवरही मोठा होईल. अमेरिकेनं भारत, चीन आणि अन्य प्रमुख व्यापार भागीदारांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क (Import Duty) लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाला त्यांनी "Discounted Reciprocal Tariff" असं नाव दिलं आहे. याचा अर्थ, जसे इतर देश अमेरिकन उत्पादनांवर कर लावतात, तसेच अमेरिका देखील कर लावणार, पण भारतासाठी हा कर किंचित कमी असेल.
ट्रम्प यांच्या मते, भारताच्या निर्यातीत मोठा वाटा असलेल्या उद्योगांना आता 26% अतिरिक्त टेरिफचा सामना करावा लागणार आहे. चीनवर 34%, युरोपियन युनियनवर 20%, जपानवर 24% आणि ब्रिटनवर 10% कर आकारला जाणार आहे. या नव्या धोरणाची अंमलबजावणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असून, 5 एप्रिलपासून सर्व देशांवर 10% बेस टॅरिफ लागू होईल, तर 9 एप्रिलपासून देश-विशिष्ट दर ठरवले जातील.
advertisement
भारताला धक्का, कारण...?
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा निर्णय मोठा धक्का असू शकतो. गेल्या दशकभरात भारत-अमेरिका व्यापार संबंध प्रबळ झाले आहेत. फार्मास्युटिकल्स, ऑटो पार्ट्स, टेक्सटाइल्स आणि केमिकल्स यांसारख्या उद्योगांसाठी अमेरिका हा सर्वात मोठा बाजार राहिला आहे. 26% अतिरिक्त कर लागू झाल्यास भारतीय उत्पादने अमेरिकन बाजारात महागडी ठरेल, परिणामी निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
कोणत्या क्षेत्रांवर मोठा परिणाम?
फार्मास्युटिकल्स – भारत जगातील सर्वात मोठा जेनेरिक औषध उत्पादक आहे आणि अमेरिका त्याचा प्रमुख ग्राहक आहे. नवीन टेरिफमुळे भारतीय औषध कंपन्यांच्या किमती वाढतील, ज्याचा फायदा अमेरिका आणि युरोपच्या फार्मा कंपन्यांना होऊ शकतो.
ऑटो पार्ट्स – भारतीय ऑटो उद्योग मोठ्या प्रमाणावर अमेरिका आणि युरोपमध्ये पार्ट्स आणि वाहने निर्यात करतो. ट्रम्प यांचा हा निर्णय भारतीय ऑटो कंपन्यांसाठी मोठा अडथळा ठरू शकतो.
advertisement
टेक्सटाइल आणि होम फर्निशिंग – भारतीय कापड उद्योग अमेरिकेत चांगला स्थिरावला आहे. मात्र, 26% टेरिफ वाढ झाल्यास, भारतीय वस्त्रप्रकार अमेरिकन बाजारपेठेत महागडे पडतील आणि प्रतिस्पर्धी देशांना फायदा होईल.
इंजिनिअरिंग आणि केमिकल्स – भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी उत्पादने आणि रासायनिक साहित्य पुरवतो. नव्या टेरिफमुळे या उत्पादनांवरही परिणाम होऊ शकतो.
ट्रम्प यांचा उद्देश काय?
ट्रम्प यांच्या मते, हा निर्णय अमेरिकेच्या स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी घेतला जात आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, स्थानिक उद्योगांना चालना देणं आणि त्यांना सक्षम करणं हा आमचा उद्देश आहे. अमेरिकेतील स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिका पुन्हा श्रीमंत होईल असंही ते म्हणाले”
advertisement
भारताची पुढील पावलं काय असतील?
अमेरिकेच्या या निर्णयावर भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, वाणिज्य मंत्री पियूष गोयल हे 5 एप्रिलपूर्वी अमेरिका आणि भारत यांच्यात काही तात्पुरते समजुतीचे करार करण्याचा प्रयत्न करू शकतात. भारत जागतिक व्यापार संघटना (WTO) किंवा द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून यावर तोडगा काढू शकतो.
हा निर्णय फक्त भारतापुरता मर्यादित आहे का?
नाही. चीन आणि युरोपियन युनियन आधीच अमेरिकेच्या या नव्या धोरणाला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. चीनने स्वतःच्या निर्यातीसाठी नवीन सवलती आणि धोरणे आखण्यास सुरुवात केली आहे. आता भारत अमेरिकेशी थेट चर्चेत उतरेल, की टेरिफ युद्ध आणखी वाढेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ट्रम्प यांच्या नव्या टेरिफ धोरणामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांवर काय परिणाम होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. मात्र, यामुळे भारतीय उद्योगांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता प्रश्न असा आहे की, भारत सरकार योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन हा कर भार कमी करू शकेल का? किंवा भारतीय उद्योगांना पर्यायी बाजार शोधावे लागतील? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 03, 2025 6:40 AM IST