सावधान! चिकन शोरमा आवडीने खाताय? खाताच 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
मुंबईतील महाराष्ट्रनगरमध्ये खराब झालेल्या चिकनपासून बनवलेला शोरमा खाल्ल्याने एका 19 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : चिकनपासून बनवलेले पदार्थ अनेकांना आवडतात. चिकन किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ असतील तोवर ते दुसऱ्या पदार्थाला हातही लावत नाहीत. चिकन कंटकी, चिकन रोल यासारखे पदार्थ फूड स्टॉलवर खूप लोकप्रिय असतात. त्यातच गेल्या काही वर्षात चिकन शोरमाचाही समावेश झाला आहे. चिकन शोरमा अनेक जंक फूडच्या स्टॉलवर मिळतो, याच शोरमामुळे एका तरुणाचा जीव गेला आहे. मुंबईतील महाराष्ट्रनगरमध्ये खराब झालेल्या चिकनपासून बनवलेला शोरमा खाल्ल्याने एका 19 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर इतर अनेक मुलांची प्रकृती बिघडली होती, पण सध्या ते बरे आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दुकानदाराला अटक केली आहे. यासंदर्भात 'आज तक'ने वृत्त दिलं आहे. मुंबई पोलीस झोन-6 चे डीसीपी हेमराज राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महाराष्ट्रनगरमध्ये 19 वर्षीय प्रथमेश भोकसेचा मृत्यू झाला आहे. त्याने 3 मे रोजी संध्याकाळी सहा वाजता चिकन शोरमा खाल्ला होता. दुसऱ्या दिवशी 4 मे रोजी सकाळी सात वाजता त्याला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला कुटुंबीयांनी प्रथमेशला प्रथम जवळच्या डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांच्या औषधाने थोडा आराम मिळाल्यावर तो घरी आला आणि यानंतर त्याने दिवसभर काहीही खाल्लं नाही.
advertisement
5 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून प्रथमेशला पुन्हा पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला केईएम रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी प्रथमेशवर उपचार करून त्याला घरी परत पाठवलं, मात्र संध्याकाळी प्रथमेशला पुन्हा त्रास होऊ लागला, त्यामुळे त्याला कुटुंबियांनी पुन्हा केईएम रुग्णालयात नेलं. त्याची बिघडती तब्येत पाहून डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतलं. डॉक्टरांच्या उपचारानंतरही प्रथमेशच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. त्यानतंर 7 मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रथमेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदार आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रझा यांना अटक केली आहे. याशिवाय शोरमाचे सॅम्पल घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
advertisement
सुरुवातीच्या तपासानुसार, खराब झालेल्या चिकनपासून बनवलेला शोरमा खाल्ल्यानंतर प्रथमेशची तब्येत बिघडली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आयपीसी कलम 304, 336, 273/34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 08, 2024 12:31 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
सावधान! चिकन शोरमा आवडीने खाताय? खाताच 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना